( पुणे )
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी तपासादरम्यान नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल याची पोलिसांनी तब्बल 10 तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या जबाबामुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिलने चौकशीत सांगितले की, सियाने तिला केतन अग्रवाल यांच्याशी लग्न करायचे नाही, असे कधीही त्याला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितले नव्हते. जर तिने अशी इच्छा व्यक्त केली असती, तर कुटुंबाने हे लग्न पुढे नेले नसते, आम्ही ते थांबवले असते, असेही त्याने स्पष्ट केले.
साहिलच्या जबाबातून काय समोर आले?
पोलिस सध्या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत. साहिलच्या जबाबानुसार, केतनसोबतच्या लग्नाबाबत सियाची कोणतीही हरकत असल्याची माहिती कुटुंबाला नव्हती. तसेच, सियाच्या कुटुंबाची तिचे चेतन चौधरीसोबत लग्न होण्यालाही कोणतीही हरकत नव्हती, अशी माहितीही चौकशीत समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या जबाबानंतर पोलिस तपासाला नवे पैलू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या माहितीबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
18 जून रोजी पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे समोर आले होते. मात्र, पुढील तपासात हा खून असल्याचा संशय बळावला. पोलिसांच्या तपासानुसार, केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी कट रचून केतन यांना दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नोव्हेंबरमध्ये होणार होते लग्न
केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह होणार होता आणि त्याची तयारीही सुरू झाली होती. मात्र, लग्नाआधीच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणातील सर्व पुरावे, डिजिटल माहिती आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासत असून हत्येमागील संपूर्ण कट उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

