( मुंबई )
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, अर्ज भरण्याच्या आज शेवटच्या दिवशी महायुतीला मोठे धक्के बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे राज्यात तब्बल 14 ते 15 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची शिवसेना यांच्यातील युती तुटली आहे.
तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचे आरोप, तर ऐनवेळी बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने अनेक ठिकाणी असंतोष उफाळून आला. काही शहरांत आनंदाचे वातावरण असले, तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी उघड नाराजी, राडा आणि बंडखोरी केल्याचेही पाहायला मिळाले.
या ठिकाणी युती तुटली / बदलली
धुळे : भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शिंदेसेना–अजित पवार राष्ट्रवादी युती; भाजप स्वबळावर
जालना : जागावाटपावरून भाजप-शिवसेना युती तुटली
छत्रपती संभाजीनगर : आठ दिवसांची चर्चा फसली; दोन्ही पक्ष स्वतंत्र
सांगली : शिंदेसेना-भाजप जागावाटप फिस्कटले
उल्हासनगर : भाजप 78 जागांवर स्वबळावर
नवी मुंबई : भाजप विरुद्ध शिंदेसेना थेट लढत
मीरा-भाईंदर : कमी जागांवरून युती तुटली
नाशिक : भाजप स्वबळावर; शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) युती
पुणे : समन्वय बिघडला; युती तुटल्यात जमा
पिंपरी-चिंचवड : तिन्ही प्रमुख पक्ष स्वबळावर
मालेगाव : भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी स्वतंत्र
लातूर : जागावाटपावरून महायुती फिस्कटली
नांदेड, अमरावती, अकोला : वेगवेगळी समीकरणे; अनेक ठिकाणी स्वबळाचा निर्णय
मुंबई–ठाण्यात मात्र युती कायम
राज्यात अनेक ठिकाणी महायुतीत तडे गेले असले, तरी मुंबई आणि ठाणे या प्रतिष्ठेच्या महानगरपालिकांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी अजित पवार गटाला बाहेर ठेवण्यात आल्याने राजकीय समीकरणे वेगळी असणार आहेत.
युती टिकली आणि तुटली याबाबत दोन्ही ठिकाणी मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिका निकालांतून महायुतीची रणनीती यशस्वी ठरते की अपयशी, हे स्पष्ट होणार आहे.

