(नाशिक)
नाशिकच्या कामटवाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित लसीकरण मोहिमेदरम्यान टीटी (धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधक) लस घेतल्यानंतर 17 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
खुटवडनगर परिसरातील रहिवासी श्रावणी अनिल पाटील (वय 17) ही नियमित लसीकरणासाठी बुधवारी दुपारी सुमारे 1 वाजता कामटवाडी आरोग्य केंद्रात आली होती. श्रावणी चा लसीकरणानंतर झालेला मृत्यू सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. श्रावणी ही आपल्या वडिलांसोबत महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात टीटीची लस घेण्यासाठी गेली होती. लसीकरणानंतर ती घरी परतत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. श्रावणीच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. काही क्षणांतच ती बेशुद्ध झाली. कुटुंबीयांनी तिला तातडीने खासगी रुग्णालयात, त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून लसीचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
120 जणांना याच लशीचे डोस; अन्य कोणालाही त्रास नाही
महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी विजय देवकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारमार्फत पुरविण्यात येणारी ही टीटी लस देशभर नियमित वापरली जाते. कामटवाडी आरोग्य केंद्राला या लशीच्या 24 व्हायल प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 12 व्हायलचा वापर करून आतापर्यंत सुमारे 120 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ज्या व्हायलमधून श्रावणीला लस देण्यात आली, त्याच व्हायलमधून आणखी पाच जणांना लस देण्यात आली होती. त्यामध्ये चार गर्भवती महिला, एक 16 वर्षीय मुलगी आणि एक 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. या सर्वांची प्रकृती सामान्य असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देवकर यांनी दिली.
वडिलांचा गंभीर आरोप
श्रावणीचे वडील अनिल पाटील यांनी लसीकरणानंतर काही मिनिटांतच मुलगी कोसळल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, “श्रावणीने घरी सर्वांसाठी थालीपीठ बनवले होते. ते खाऊन आम्ही लसीकरण केंद्रात गेलो. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती अचानक जमिनीवर कोसळली. तिच्या नाकातून रक्त आले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”
नातेवाईकांचा निष्काळजीपणाचा आरोप
श्रावणीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी महानगरपालिका प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तसेच इन-कॅमेरा शवविच्छेदन न झाल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आरोग्य विभागाने कोणतेही निष्कर्ष काढण्यास नकार दिला असून तपास अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.
लस घेतल्यानंतर श्रावणी वडिलांसोबत मेडिकल दुकानाच्या दिशेने जात असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याची संपूर्ण घटना परिसरातील दुकानाबाहेरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजचाही तपासात महत्त्वाचा पुरावा म्हणून वापर केला जात आहे.

