( मुंबई )
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील नामांकित हॉटेल्सनाही बसला आहे. मंगळवारी एफडीएच्या विशेष पथकाने दक्षिण मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई करत त्यांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ रद्द केले. याशिवाय अमरावतीतील एका हॉटेलविरोधातही कठोर कारवाई करण्यात आली असून, वैध अन्न परवान्याविना व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने ते तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, अस्वच्छ स्वयंपाकगृहे, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अभाव, निकृष्ट दर्जाची अन्न साठवणूक आणि कीटक नियंत्रणातील त्रुटी यामुळे ही कारवाई करण्यात आली. याचबरोबर राज्यभरातील 38 रक्तपेढ्यांवरही एफडीएने मोठी कारवाई करत 34 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित, तर चार रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील ‘शालिमार हॉस्पिटॅलिटी’ या हॉटेलमध्ये तपासणीदरम्यान गंभीर अनियमितता आढळून आली. या हॉटेलला काही दिवसांपूर्वीच व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्यासाठी सुधारणा नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक सुधारणा करण्यात आल्या नसल्याचे पुन्हा झालेल्या तपासणीत स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांना येथे स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि व्यवस्थापनाशी संबंधित तब्बल 25 गंभीर त्रुटी आढळल्या. ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने या हॉटेलचा परवाना तात्काळ रद्द केला.
भेंडी बाजारातीलच प्रसिद्ध ‘नूर मोहम्मदी’ हॉटेलमध्येही तपासणीदरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या. स्वयंपाकघराच्या खालच्या मजल्यांवर काळ्या तेलाचे जाड थर साचलेले होते. कबाब विभागाजवळील उघड्या खिडक्यांमुळे कीटक आणि इतर जीवांचा मुक्त प्रवेश होत असल्याचे आढळले. भिंती आणि छतांवरील रंग निघालेला होता तसेच तेलाचे थर साचले होते. कच्च्या अन्नसाहित्याची अस्वच्छ साठवणूक, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव, जुनी व अस्वच्छ भांडी, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीच्या नोंदी नसणे आणि कीटक नियंत्रणासाठी आवश्यक ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव अशा अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामुळे या हॉटेलचाही अन्न व्यवसाय परवाना रद्द करण्यात आला.
उमरखाडी परिसरातील ‘मे. रहमानिया रेस्टॉरंट’ मध्येही अन्नसुरक्षा नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे तपासणीत उघड झाले. अन्नपदार्थ, रसायने आणि पॅकेजिंग साहित्य साठवण्यासाठी अपुरी व्यवस्था, कीटकप्रतिबंधक नसलेले दरवाजे, गंजलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनविलेली स्वयंपाकाची उपकरणे, भिंती आणि छतांवरील निघालेला रंग व प्लास्टर, अन्नपदार्थांच्या गुणवत्ता तपासणीच्या नोंदींचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याच्या आवश्यक चाचण्या न केल्याचे आढळून आले. या गंभीर त्रुटींमुळे एफडीएने या हॉटेलचाही परवाना तात्काळ रद्द केला.
एफडीएच्या कारवाईचा फटका विदर्भालाही बसला आहे. अमरावतीतील शेगाव नाका परिसरातील ‘अमरावती दरबार’ या हॉटेलमध्ये कोणताही वैध अन्न व्यवसाय परवाना नसताना व्यवसाय सुरू असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित हॉटेलला तातडीने व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
हॉटेल्सवरील कारवाईसोबतच एफडीएने राज्यभरातील रक्तपेढ्यांची विशेष तपासणी मोहीमही राबवली. या मोहिमेदरम्यान रक्तसुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 38 रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. यामध्ये 34 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर चार रक्तपेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. गंभीर नियमभंग आणि आवश्यक मानकांची पूर्तता करण्यात अपयश आल्यामुळे जेजे महानगर रक्तपेढीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख रक्तपेढ्यांपैकी एक असलेल्या या संस्थेविरोधातील कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय बदलापूर येथील ‘माया ब्लड सेंटर’मध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्याने एफडीएने हे केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश देत ते सील केले आहे.
या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. रक्तदाते आणि रुग्णांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या संस्था तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर अन्न व्यवसायांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातील हॉटेल्स, अन्न व्यावसायिक आणि रक्तपेढ्यांवर अचानक तपासण्या अधिक तीव्र करण्यात येणार असून, अन्न आणि रक्ताची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एफडीएची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हॉटेलचालकांसाठी FDA चे ५ नियम बंधनकारक
या धडक कारवाईसोबतच अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यवसायिकांसाठी काही महत्त्वाच्या आणि कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण आणि अन्नसुरक्षेची मानके अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
1. ग्राहकांना मोफत आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देणे बंधनकारक
प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकांना मोफत, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्राहकांवर बाटलीबंद (मिनरल) पाणी खरेदी करण्याची सक्ती किंवा दबाव टाकता येणार नाही.
2. शाकाहारी आणि मांसाहारी अन्नासाठी स्वतंत्र व्यवस्था
शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची साठवणूक, प्रक्रिया आणि स्वयंपाक करण्यासाठी स्वतंत्र जागा असणे आवश्यक आहे. तसेच दोन्ही प्रकारच्या अन्नासाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड, सुरी आणि अन्य स्वयंपाक साहित्य वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून अन्नाचे दूषितीकरण (Cross Contamination) टाळता येईल.
3. जळालेले किंवा वापरलेले तेल पुन्हा वापरण्यास सक्त मनाई
एकदा तळण्यासाठी वापरलेले काळे, जळालेले किंवा निकृष्ट झालेले तेल पुन्हा वापरता येणार नाही. अशा तेलाचा वापर आरोग्यासाठी घातक असल्याने त्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
4. वृत्तपत्रात अन्नपदार्थ पॅक करण्यास बंदी
ग्राहकांना पार्सल देताना वृत्तपत्राचा कागद किंवा अन्य अन्नासाठी अयोग्य साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्नपदार्थांचे पॅकिंग करण्यासाठी केवळ मान्यताप्राप्त फूड-ग्रेड रॅपिंग पेपर किंवा सुरक्षित पॅकेजिंग साहित्याचा वापर करणे बंधनकारक राहील.
5. कर्मचाऱ्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी अनिवार्य
हॉटेलच्या स्वयंपाकघरात किंवा अन्न हाताळण्याच्या कामात कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. याशिवाय स्वयंपाकघर परिसरात तंबाखू, गुटखा किंवा तत्सम पदार्थांचे सेवन करणे, तसेच थुंकणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही एफडीएने दिला आहे.

