( खेड )
कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघातात खेड तालुक्यातील ५८ वर्षीय मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. फुरुस येथे मजुरीचे काम करत असताना त्यांच्या पोटावर अचानक लाकूड पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत दिनेश गणू बाईत (वय ५८, रा. संगलट शेरवली, ता. खेड) हे फुरुस येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. काम सुरू असताना अचानक त्यांच्या पोटावर जड लाकूड पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने दापोली येथील मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ५१/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

