(राजापूर / तुषार पाचलकर)
कोंकणात गेल्या दहा वर्षांत काजू लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले, तरी बदलते हवामान, विविध रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि परदेशातून आयात होणाऱ्या काजू बियामुळे स्थानिक बागायतदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच काजू झाडांवर वाढलेल्या खोडकिड्याच्या प्रादुर्भावामुळे अनेक बागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
खोडकिडा झाडाच्या खोडात शिरून आतील भाग पोखरतो. त्यामुळे झाड हळूहळू सुकून अखेर पूर्णपणे नष्ट होते. रासायनिक औषधांची फवारणी करूनही अनेकदा या किडीवर प्रभावी नियंत्रण मिळत नसल्याने काजू उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
अशा परिस्थितीत राजापूर तालुक्यातील रायपाटण-बागवाडी येथील सचिन खोचाडे यांनी खोडकिडा काढण्याची प्रभावी आणि कौशल्यपूर्ण पद्धत विकसित केली असून, त्यांच्या या कामामुळे अनेक काजू बागायतदारांना मोठा दिलासा मिळत आहे.
सचिन खोचाडे झाडाच्या खोडातील किडा काळजीपूर्वक बाहेर काढतात. त्यांच्या या पद्धतीमुळे झाडाचे नुकसान होत नाही आणि झाड पुन्हा जोमाने वाढण्यास मदत होते. त्यामुळे अनेक बागायतदार त्यांच्या सेवेकडे वळत असून, राजापूर पूर्व विभागात त्यांच्या कामाची मोठी चर्चा सुरू आहे.
खोडकिड्याच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सचिन खोचाडे यांचे हे कौशल्य काजू बागायतदारांसाठी आशेचा किरण ठरत असून, कोंकणातील काजू बागांचे संरक्षण करण्यासाठी अशा प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

