( खेड )
खेड भोस्ते घाट येथे मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. कोकण दर्शन करून मुंबईकडे परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचे ब्रेक फेल झाल्याने समोर जाणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. मुंबईच्या दिशेने उतारावर येत असताना टेम्पो ट्रॅव्हलरचे अचानक ब्रेक निकामी झाले. नियंत्रण सुटल्याने वाहनाने समोर असलेल्या हुंडाई एक्स्टर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार महामार्गालगतच्या खड्ड्यात जाण्यापासून बचावली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाहनांचे मोठे नुकसान, वाहतूक विस्कळीत
या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि कशेडी महामार्ग पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे.

