(फुणगूस / एजाज पटेल)
गावाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या फुणगूस ग्रामपंचायतीच्या कारभारावरच आता ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नव्याने उभारलेल्या ग्रामपंचायत इमारतीवर मोठा निधी खर्च करण्यात आला असला, तरी नागरिकांसाठीचे शौचालय जुनेच ठेवण्यात आल्याने आणि तेथे पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
काही महिन्यांपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या इमारतीत ग्रामपंचायत कार्यालयासह फुणगूस व कोंडये या महसूल गावांचे तलाठी कार्यालय आणि पोस्ट कार्यालयही कार्यरत आहे. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी विविध कामांसाठी येथे येत असतात.
मात्र, नव्या इमारतीसह नागरिकांसाठी आधुनिक शौचालयाची व्यवस्था करण्यात आली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. शौचालयात नळ किंवा कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रश्नावर पडदा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीने शौचालयाबाहेर प्लास्टिकची पाण्याची टाकी ठेवली आहे. या टाकीत पावसाचे पाणी साठवून शौचालयासाठी वापरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही टाकी उघडी असून त्यात गाळ, कचरा आणि घाण साचत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
डासांची उत्पत्ती वाढल्याचा आरोप
उघड्या टाकीमुळे परिसरात डासांची संख्या वाढत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायत आवारातच अशी परिस्थिती असणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
एका बाजूला ग्रामपंचायत परिसरात ‘निर्मळ ग्रामपंचायत’चा फलक लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे शौचालयासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने हा केवळ दिखाऊपणा असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
चौकशीची मागणी
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शौचालयात कायमस्वरूपी नळ व पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, तसेच उघडी पाण्याची टाकी हटवून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

