(मुंबई)
मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीकॉम (TYBCom) परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणाची सीआयडी (CID) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी गुरुवारी विधान परिषदेत केली. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले.
एप्रिलमध्ये तीन प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आरोप
एप्रिल 2026 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या ‘डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस (Taxation)’, ‘इकॉनॉमिक्स ऑफ कॉमर्स (Business Economics)’ आणि ‘कॉस्ट अकाउंटिंग/कॉमर्स’ या तीन महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता.
या प्रकरणी विद्यापीठातील कंत्राटी शिपाई सुदेश तुकाराम इंदप याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
‘संघटित रॅकेटचा संशय’, भाई जगताप यांची मागणी
प्रश्नोत्तराच्या तासात भाई जगताप यांनी या प्रकरणावर लक्षवेधी सूचना मांडत, पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगितले. त्यांनी आरोप केला की, विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले असले तरी पोलिसांकडे तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
त्यांच्या मते, या प्रकरणात केवळ काही विद्यार्थ्यांचा नव्हे, तर संघटित रॅकेट आणि परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित काही व्यक्तींचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली.
चंद्रकांत पाटील यांचे उत्तर
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पेपरफुटीचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मान्य केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सीआयडी चौकशीची थेट घोषणा करण्याचा अधिकार सरकारकडे नसून विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंना त्याबाबत सूचना करण्यात येतील. त्यानंतर विद्यापीठ योग्य निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.
याशिवाय भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा सुरक्षाव्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून, डिजिटल प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अनिल परबांचे आरोप, मंत्र्यांचा इन्कार
या चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट)चे आमदार अनिल परब यांनी गंभीर आरोप करत, पेपरफुटी प्रकरणातील कथित आरोपी सलगर याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सलगर हा चंद्रकांत पाटील यांचा माणूस असल्याचे सांगत फिरत असल्याचा दावा केला आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून त्यालाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी केली. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आणि या प्रकरणात कोणालाही संरक्षण दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

