(रत्नागिरी / प्रतिनिधी)
विकासाच्या नावाखाली उभारलेली काँक्रीटीकरण मार्गिका आता वेगाच्या उन्मादाची साक्षीदार ठरत आहे. खेडशी भागात वाहनांच्या स्पीड कंट्रोलसाठी ठेकेदार कंपनीकडून मोठे बॅलर उभारण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या वाहनांचा बेफाम वेग काही केल्या आटोक्यात येताना दिसत नाही. परिणामी, छोटे-मोठे अपघात वारंवार घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे स्टेशन ते हातखंबा दरम्यानचा काँक्रीटीकरण झालेला सरळसोट मार्ग एसटी, ट्रक आणि कार चालकांसाठी जणू वेगाची आमंत्रणपत्रिकाच ठरत आहे. हातखंबा ते साळवी स्टॉपपर्यंत मोठ्या वाहनांसाठी वेगमर्यादा सक्तीची करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण, पूर्वीपेक्षा या मार्गिकेवर अपघातांची संख्या वाढल्याचे वास्तव स्थानिकांकडून अधोरेखित केले जात आहे. सरळ रेषेत दिसणारा रस्ता आणि गुळगुळीत पृष्ठभाग यामुळे अवजड वाहनचालक बेधडक वेग धारण करतात. या वेगवान प्रवाहात दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. वेगमर्यादा केवळ कागदावर न राहता तिची अंमलबजावणी कठोरपणे झाली, तरच या वेगाला लगाम बसू शकतो.
दरम्यान, या मार्गावरील चांदसूर्या परिसर जंगललगत असल्याने रानडुक्कर, माकडे आदी वन्यप्राणी रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत जखमी अथवा मृत्युमुखी पडत आहेत. अनेकदा अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होतात. कुत्र्यांसारख्या भटक्या प्राण्यांच्याही मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. महामार्गाचा विस्तार झाला; मात्र मानवी आणि वन्यजीवांच्या सुरक्षेची हमी मात्र अद्याप अधांतरीच आहे.
वेगमर्यादा फलक, स्पीड गनद्वारे कारवाई, सीसीटीव्ही यंत्रणा, रंबल स्ट्रिप्स तसेच वन्यप्राण्यांसाठी चेतावणी चिन्हे आणि सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था यांसारख्या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. अन्यथा ‘विकास’ या नावाखाली सुरू असलेला हा वेगाचा खेळ आणखी किती जीव घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन ठोस आणि तातडीची पावले उचलावीत, जेणेकरून या मार्गावरील प्रवास खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सुखकर ठरेल, अशी मागणी देखील वाहनचालकांमधून होत आहे.

