(ठाणे)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 3-ड (सर्वसाधारण पुरुष) मधील मतदान प्रक्रियेला काल अनपेक्षित आणि गंभीर वळण लागलं. मतदान सुरू झाल्यानंतर अवघ्या पहिल्याच तासात उघड झालेल्या एका धक्कादायक त्रुटीमुळे संपूर्ण प्रभागात खळबळ उडाली असून, निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आघाडीचे उमेदवार ॲड. शेखर अप्पाराव वाकोडे यांच्या नावात थेट ईव्हीएम मशीनवर झालेल्या कथित चुकीमुळे हा वाद उफाळून आला. अधिकृत कागदपत्रांनुसार उमेदवाराचं नाव ‘ॲड. शेखर अप्पाराव वाकोडे’ असताना, ईव्हीएमवर मात्र ‘ॲड. शेख अप्पाराव वाकोडे’ असा उल्लेख दिसून आला.
धक्कादायक बाब म्हणजे, प्रभागातील तब्बल 63 पैकी 63 मतदान केंद्रांवर हीच चूक एकसारख्या पद्धतीनं आढळून आली. यामुळे अनेक मतदार संभ्रमात पडले. मतदान केंद्रांवर चर्चा, गोंधळ आणि अस्वस्थ वातावरण निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
ही बाब लक्षात येताच ॲड. शेखर वाकोडे यांनी तात्काळ निवडणूक प्रशासन आणि संबंधित बूथ अधिकाऱ्यांचं लक्ष या गंभीर त्रुटीकडे वेधलं. मात्र सकाळपासून दुपारपर्यंत सातत्यानं पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस भूमिका, स्पष्टीकरण किंवा दुरुस्तीची प्रक्रिया सुरू न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मतदान सुरू असतानाच उमेदवाराच्या नावात झालेली मूलभूत चूक दुरुस्त न होणं हे केवळ निष्काळजीपणाचं नव्हे, तर लोकशाही प्रक्रियेला थेट धक्का देणारं कृत्य असल्याचं त्यांनी नमूद केलं.
या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना ॲड. शेखर अप्पाराव वाकोडे यांनी हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून, जाणीवपूर्वक रचलेलं कट-कारस्थान असल्याचा गंभीर आरोप केला. आपण प्रभागात आघाडीवर असल्याचं स्पष्ट होताच विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी नावात बदल घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला. हा बदल किरकोळ नसून, निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करणारा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
या घटनेमुळे आपला समान संधीचा आणि निवडणूक लढवण्याचा मूलभूत हक्क डावलण्यात आल्याचं सांगत, ॲड. वाकोडे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच यासंदर्भात याचिका दाखल केली जाणार असून, या गंभीर त्रुटीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मतदानाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे प्रभाग क्रमांक 3-ड मधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होते. निवडणूक यंत्रणेची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
या घटनेनं निवडणूक प्रक्रियेतील दुहेरी निकष पुन्हा एकदा समोर आणले आहेत. उमेदवाराच्या अर्जात किरकोळ चूक आढळल्यास तात्काळ अर्ज बाद केला जातो, मात्र याच यंत्रणेकडून सर्व मतदान केंद्रांवर एकसारखी गंभीर चूक होऊनही जबाबदारी स्वीकारली जात नाही, ही बाब चिंताजनक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

