(ठाणे)
अमली पदार्थ विरोधी मोहिमेत ठाणे गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. खंडणी विरोधी पथकाने घोडबंदर रोडवर सापळा रचून तब्बल 13 कोटी रुपयांहून अधिक किमतीची हिरोईन जप्त केली आहे. या कारवाईत तीन आंतरराज्यीय तस्कर अटकेत आले असून त्यांचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त (DCP) अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी आशिष ठाकूर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एका व्यक्तीने घोडबंदर रोडवरील गायमुख भागात हिरोईन विक्रीसाठी येण्याची तयारी केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला आणि सुरुवातीला रिक्षाचालक फरदीन गुलजार मुल्ला याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडून अमली पदार्थ सापडले.
तपासात समोर आले की या तस्करीमध्ये आणखी दोन व्यक्तींचा सहभाग आहे. पोलिसांनी तातडीने त्यांना अटक केली. एकूण 4 किलो 576 ग्रॅम हिरोईन जप्त करण्यात आली असून, तिची भारतीय बाजारपेठेतील किंमत 13 कोटी रुपयांहून अधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सहा पट अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अटक केलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध ठाण्याच्या कासारवडवली पोलिस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदा 1985 च्या कलम 8 (अ) आणि 21 (अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक 97/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, पीएसआय सुनील तरमाले पुढील तपास करत आहेत.
DCP अमरसिंह जाधव यांनी नागरिकांना आवाहन केले की, अशा कोणत्याही अवैध ड्रग्ज व्यवहाराबाबत माहिती मिळाल्यास लगेच अमली पदार्थ विरोधी पथक किंवा गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल.
या यशस्वी कारवाईमुळे ठाणे जिल्ह्यातील ड्रग्ज नेटवर्कवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, तसेच स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षा आणि जागरूकतेचा संदेश पाठवला गेला आहे.

