(चिपळूण)
तालुक्यातील तळसर-मुंढे गुरववाडी येथील ५३ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिरगाव येथे कामासाठी गेलेल्या या व्यक्तीस अचानक चक्कर आल्याने ते खाली पडले होते. त्यानंतर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय सिताराम खेतले (वय ५३, रा. तळसर, मुंढे गुरववाडी, ता. चिपळूण) हे १६ जून रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कामानिमित्त शिरगाव येथे गेले होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती. घटनेनंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी १७ जून रोजी दुपारी वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे हलविण्यात आले. सुरुवातीला त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले.
दरम्यान, उपचार सुरू असतानाच १८ जून रोजी सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मृत झालेल्या प्रौढाचे पुत्र विश्वभर खेतले यांनी दिलेल्या माहितीनुसार अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेची नोंद बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आमृ.) क्रमांक १६/२०२६ म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

