(चिपळूण / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावर सावर्डे येथे दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकावर आदळल्याने दोघांनाही दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमेय जगन्नाथ बोल्ये (वय २२, रा. रामटेकडी डोंगर विभाग, शिवडी, मुंबई; मूळ रा. ताम्हाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा युवक युनिकॉर्न (क्र. एमएच-४७-सीबी-०७८८) या दुचाकीवरून मुंबई–गोवा महामार्गाने मुंबईहून राजापूरकडे जात होता. त्याच्यासोबत यश सहदेव बोल्ये (वय २४, रा. ताम्हाणे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हा तरुण मागे बसलेला होता. सकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास सावर्डे येथे ‘हेवन हॅप्पी पंजाबी धाबा’समोर आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या फलकावर जोरात आदळली. या अपघातात चालक अमेय बोल्ये याला गंभीर दुखापत झाली, तर मागे बसलेला यश बोल्ये यालाही किरकोळ दुखापत झाली. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातामधील जखमींना तातडीने उपचारासाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार गगनेश चंद्रकांत पटेकर (ब.क्र. १२२५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. २१/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२५ (अ), ११५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सावर्डे पोलिसांकडून सुरू आहे.

