(चिपळूण)
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित, मुंबई विद्यापीठ संलग्न डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, मांडकी पालवण यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे श्रमसंस्कार निवासी शिबिर ढाकमोळी येथे यशस्वीरीत्या पार पडले. हे शिबिर बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ ते मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.
दि. २४ डिसेंबर रोजी ढाकमोळी (सहाणवाडी) येथील सहाणेवर दुपारी ३ वाजता उद्घाटन सोहळा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे होत्या, तर उद्घाटन ढाकमोळी गावच्या सरपंच सौ. भारती लाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच महेंद्र बारगोडे, ग्रामसेवक दिनेश पारशी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांचे न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, एकात्मता आणि समानता असे पाच गट पाडून शिबिराचे नियोजन सुरू करण्यात आले.
दि. २५ डिसेंबर रोजी बौद्धिक सत्रात प्रा. मिलिंद कडवईकर यांनी “मी यशस्वी होणारच!” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दि. २६ डिसेंबर रोजी युगंधरा राजेशिर्के यांनी आनापन विपश्यना या विषयावर मार्गदर्शनासह प्रात्यक्षिक सादर केले. दि. २७ डिसेंबर रोजी पुष्पा पाटील यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर संवाद साधला. दि. २८ डिसेंबर रोजी विलास डिके यांनी “भारतीय संविधान आणि विद्यार्थी” या विषयावर मार्गदर्शन केले, तर दि. २९ डिसेंबर रोजी कॉम्रेड संदीप पवार यांनी “समाजजागृतीसाठी विद्यार्थ्यांची भूमिका” या विषयावर विचार मांडले.
दि. ३० डिसेंबर रोजी शिबिराचा समारोप सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे होत्या. यावेळी सरपंच सौ. भारती लाड, माजी सरपंच महेंद्र बारगोडे, भरत लाड, जयंत लाड, ग्रामपंचायत सदस्या अमिता लाड, ग्रामपंचायत कर्मचारी मंगेश लाड, अशोक महाडिक, हर्षद लाड तसेच माजी विद्यार्थिनी साक्षी लाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरादरम्यान गावातील शाळा, धार्मिक स्थळे व पाणवठ्यांची स्वच्छता, गाव सर्वेक्षण, प्रत्येक वाडीत आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे, स्वच्छता रॅली, पथनाट्य तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. शिबिरातील उल्लेखनीय उपक्रम म्हणून गावात एकूण पाच बंधारे बांधण्यात आले. यासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सानिया मुल्लाजी, प्रा. वर्षा डिके, प्रा. संदीप येलये, प्रा. अशोक लाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.

