(चिपळूण)
येथील ज्येष्ठ व्यापारी, गवळी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडई सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष बाबुराव गोविंद भालेकर यांचे बुधवारी पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने भालेकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. ते ८० वर्षांचे होते.
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गौळवाडी येथील मूळचे रहिवाशी असलेले बाबुराव भालेकर हे अनेक वर्षे चिपळूण बाजारपेठेत ज्येष्ठ भाजी व्यापारी म्हणून कार्यरत होते. जुन्या महर्षी कर्वे भाजी मंडई इमारतीत दर्शनी भागातच ते भाजी विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यानंतर त्यांचे दोन चिरंजीव हा व्यवसाय सांभाळत आहेत. बाबुराव भालेकर हे महर्षी कर्वे भाजी मंडई सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून २००२ पासून काही वर्ष काम करत होते. या कारकीर्दीत त्यांनी गणेशोत्सवानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाने चांगली झेप घेतली. याशिवाय सामाजिक क्षेत्रातही ते कायम सक्रिय होते.