(मुंबई)
राज्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला असून, मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तसेच जंगलातील वन्यप्राण्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म उभारण्याची योजनाही सरकार राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना वनमंत्र्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
राज्यात 2023 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात 55 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा घटना कमी करण्यासाठी वन विभागाने 260 कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
42 महिन्यांत 450 वाघांचे स्थलांतर
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील जंगलांमध्ये वाघांची संख्या जंगलाच्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्यामुळे ते मानवी वस्त्यांकडे वळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अतिरिक्त वाघांचे अन्य अभयारण्यात स्थलांतर करण्याची मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना गणेश नाईक यांनी पुढील 42 महिन्यांत ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर राज्यातील विविध भागांमध्ये अभयारण्य विकसित करून सुमारे 450 वाघांचे स्थलांतर करण्यात येईल, अशी घोषणा केली.
जंगलातील खाद्यसाखळी मजबूत करण्यासाठी रॅबिट फार्म
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी जंगलात वन्यप्राण्यांसाठी खाद्याची कमतरता भासत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.
यावर वनमंत्री म्हणाले की, जंगलातील खाद्यसाखळी मजबूत करण्यासाठी पोल्ट्री फार्मच्या धर्तीवर रॅबिट फार्म उभारण्यात येतील. तसेच हरणांसारख्या शाकाहारी वन्यप्राण्यांची संख्या वाढविण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील. यामुळे वाघ आणि इतर मांसाहारी प्राण्यांना जंगलातच पुरेसे खाद्य उपलब्ध होईल आणि मानवी वस्त्यांमध्ये त्यांचा वावर कमी करण्यास मदत होईल.

