(मुंबई)
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेख चौकात उड्डाणपूल जानेवारी २०२६पर्यंत पूर्ण झालेला असेल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. काम चालू असताना गर्डर आणि लॉन्चरसह उड्डाणपुलाचा काही भाग कोसळून ७ महिने झाले तरी या पुलाचे काम सुरू झाले नसल्याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्र्यांनी ही ग्वाही दिली.
राज्यात समृद्धी महामार्गासह अनेक रस्त्यांची कामे झाली, मात्र कोकणातील या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रडतखडत सुरू असल्याकडे जाधव यांनी लक्ष वेधले. महामार्गावरील परशुराम घाटात रोज दरड खाली येते. मे २०२६ साली रस्ता पूर्ण करणार असे मंत्री सांगत असले तरी या महामार्गावरील अनेक पुलांची कामे बाकी आहेत, हा रस्ता अजून चार वर्ष तुम्ही पूर्ण करू शकणार नाहीत, असा दावा जाधव यांनी यावेळी केला. या प्रश्नाला उत्तर देताना भोसले म्हणाले, चिपळूण शहरातील पुलाचे काम ५० टक्के काम पूर्ण झालेले आहे. जानेवारी २०२६ अखेर पुलाचे काम पूर्ण होईल. पुलाचे काम सुरू असताना ते कोसळले, त्याप्रकरणी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाची चौकशी चालू आहे.