(तिरुमला /आंध्र प्रदेश)
जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम् (TTD) मध्ये लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात भेसळ झाल्याचे प्रकरण उघड झाल्याने देशभरात संताप व्यक्त होत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमधील एका डेअरीनं २०१९ ते २०२४ या पाच वर्षांत तब्बल ६८ लाख किलो बनावट तूप देवस्थानाला पुरवलं असून त्याची किंमत २७५ कोटी रुपयांहून अधिक असल्याचं निष्पन्न झालं आहे.
दूध-लोण्याचा एक थेंब न वापरता तूपनिर्मिती
सीबीआय आणि विशेष तपास पथकाने सादर केलेल्या अहवालानुसार, उत्तराखंडच्या भगवानपूर येथील ‘भोले बाबा ऑर्गॅनिक डेअरी’ ही या घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आहे. कंपनीचे प्रवर्तक पोमिल जैन आणि विपिन जैन यांनी एकही लिटर दूध किंवा लोणी न वापरता केवळ रासायनिक पदार्थांच्या साहाय्याने बनावट तूप तयार करून पुरवठा केला. या भेसळीसाठी त्यांनी पाम तेल आणि पाम कर्नल तेल वापरले. त्याला तुपासारखा रंग, वास आणि चव आणण्यासाठी अॅरिस्टो केमिकल्स आणि अजय कुमार सुगंध या केमिकल पुरवठादारांकडून मोनोडिग्लिसराइड्स, अॅसिटिक अॅसिड एस्टर, लॅक्टिक अॅसिड यांसारखी रसायने मोठ्या प्रमाणात मागवली.
फेटाळलेले तूप पुन्हा देवस्थानात पोहोचले!
या घोटाळ्याचा आणखी धक्कादायक भाग म्हणजे, टीटीडीने एकदा फेटाळलेले भेसळयुक्त तूप पुन्हा त्यांनाच पुरवले गेले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात टीटीडीने एआर डेअरीकडून आलेले चार टँकर “प्राण्यांच्या चरबीची भेसळ” असल्याचे सांगत परत पाठवले होते. मात्र, सीबीआयच्या तपासात आढळले की, हे टँकर डेअरीकडे न परतता तिरुपतीजवळील वैष्णवी डेअरीमार्फत पुनःलेबल करून ऑगस्ट २०२४ मध्ये पुन्हा टीटीडीला पुरवण्यात आले. हाच भेसळयुक्त तूप नंतर पवित्र लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरला गेला.
ब्लॅकलिस्ट असूनही पुरवठा
टीटीडीने भोले बाबा डेअरीला २०२२ मध्ये ब्लॅकलिस्ट केले असतानाही त्यांनी वैष्णवी डेअरी, मल गंगा आणि एआर डेअरी फूड्स या विविध कंपन्यांच्या नावाखाली पुरवठा सुरू ठेवला. सध्या सीबीआय आणि विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणातील सर्व कंपन्या, त्यांच्या मालकांचे आर्थिक व्यवहार आणि टीटीडीमधील संशयास्पद अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणाने तिरुपती देवस्थानाच्या पवित्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, श्रद्धाळूंत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

