(देवरूख)
देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत सेवा ज्येष्ठतेनुसार रायगड येथे पोलीस उपअधीक्षक (DySP) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी देवरूख पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर उदय झावरे यांनी कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि धडाडीचे अधिकारी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावण्यात आला, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
येत्या २७ जून रोजी देवरूखचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण होणार होते. त्याआधीच त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती झाल्याने पोलीस दलासह देवरूख परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रायगड येथे नव्या जबाबदारीची धुरा स्वीकारणाऱ्या उदय झावरे यांना विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

