(पुणे)
पुणे-पिंपरी-चिंचवडमधील तरुण उद्योगपती केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांनी हा पूर्वनियोजित खून असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात केतन यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, प्रेमसंबंध आणि नियोजित कटातून हा गुन्हा घडल्याचा आरोप आहे.
लोहगड किल्ल्यावर नेऊन 450 फूट दरीत ढकलल्याचा आरोप
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. मात्र, कुटुंबीयांच्या इच्छेमुळे सियाचे लग्न केतन अग्रवाल यांच्याशी ठरले होते. त्यामुळे केतन अडथळा ठरत असल्याची भावना निर्माण झाल्याने दोघांनी त्यांना मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यानुसार, फिरण्याच्या बहाण्याने केतन यांना मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर नेण्यात आले आणि तेथील सुमारे 450 फूट खोल दरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे.
सियाच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सिया गोयलच्या कुटुंबीयांवरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिया आणि चेतन यांच्यातील संबंधांची माहिती कुटुंबीयांना होती. तरीही ही बाब लपवून ठेवत केतनसोबत लग्न ठरवण्यात आले. त्यामुळे या कटात इतरांचाही सहभाग तपासला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
17 कोटींच्या शाही लग्नाची तयारी; दोन चार्टर्ड विमानांचीही व्यवस्था
केतन आणि सिया यांचा विवाह यंदा नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील उदयपूर येथे अत्यंत शाही पद्धतीने होणार होता. पाहुण्यांच्या निवासासाठी तब्बल 17 कोटी रुपयांचा आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन विशेष विमाने भाड्याने घेण्याची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, लग्नाआधीच घडलेल्या या हत्या प्रकरणाने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
बाली ट्रिपपूर्वी पासपोर्ट गायब; कुटुंबीयांचा संशय
लग्नापूर्वी केतन आणि सिया बाली येथे फिरण्यासाठी जाणार होते. मात्र, ऐनवेळी केतन यांचा पासपोर्ट गहाळ झाल्याने त्यांना विमानतळावरून परतावे लागले. केतनच्या कुटुंबीयांनी या घटनेकडेही संशयाने पाहिले असून, हा देखील कटाचाच भाग असू शकतो, असा दावा केला आहे. या प्रकरणाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्डमधून उघड झाला कट
पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयलचा मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि घटनास्थळावरील तांत्रिक पुराव्यांची तपासणी केली. तपासात सिया आणि चेतन यांच्यातील सातत्यपूर्ण संपर्क तसेच संशयास्पद हालचाली समोर आल्याचे सांगण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांकडून महत्त्वाची माहिती मिळाल्याचा पोलिसांचा दावा असून, डिजिटल पुरावे या प्रकरणात निर्णायक ठरत आहेत.
या हत्या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. हत्येच्या चार दिवस आधीही सियाने केतनची गडावरुन ढकलून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणात आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 14 जून रोजी लोहगड किल्ल्यावर झालेली घटना ही केतनच्या जीवावर झालेला पहिला प्रयत्न होता.
विशाल अग्रवाल म्हणाले, “14 जून रोजी केतन आणि सिया दोघे लोहगड किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी सियाने केतनला किल्ल्यावरून ढकलल्याचा आमचा आरोप आहे. ढकलल्यानंतर केतन घसरला; मात्र एका झुडपाला त्याचा हात लागल्याने त्याने ते घट्ट पकडले आणि त्याचा जीव वाचला.” ते पुढे म्हणाले, “थोड्याच वेळात केतनला आपण ढकलले गेलो होतो आणि थोडक्यात बचावलो आहोत, याची जाणीव होऊ लागली. हे गुपित उघड होईल या भीतीने सियाने तत्काळ ‘साप… साप…’ अशी आरडाओरड सुरू केली आणि धावत जाऊन केतनला मिठी मारली. त्यामुळे ही घटना अपघात असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असा दावा विशाल अग्रवाल यांनी केला. मात्र, या सर्व आरोपांची अद्याप अधिकृत तपासातून पुष्टी झालेली नसून, या दाव्यांची सत्यता तपासली जात आहे.
‘लग्न नको होतं तर नकार दिला असता’ : वडिलांचा संतप्त सवाल
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले, “जर सियाला हे लग्न करायचंच नव्हतं, तर तिने स्पष्ट नकार दिला असता. आम्ही क्षणाचाही विलंब न करता लग्न मोडलं असतं. मात्र, माझ्या 26 वर्षांच्या मुलाचा जीव घेण्याचा निर्णय का घेतला? आम्हाला फक्त न्याय हवा आहे. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.” केतनचे नातेवाईक कुलदीप अग्रवाल यांनीही “ही केवळ हत्या नाही, तर मोठं षड्यंत्र आहे. दोषींना शिक्षा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” अशी भूमिका मांडली.
केतनच्या वडिलांनी सांगितले की, “सुरुवातीला आम्हालाही ही घटना अपघातच वाटली होती. लोहगड किल्ल्यावर पाय घसरून आमच्या मुलाचा मृत्यू झाला, असेच आम्ही समजत होतो. मात्र, केतनचा मृतदेह घरी आणल्यानंतर सियाच्या वागणुकीने आमच्या मनात संशय निर्माण झाला. होणाऱ्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर कोणतीही मुलगी दुःखाने कोलमडून जाते, तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसतात. पण सियाच्या चेहऱ्यावर ना दुःख दिसलं, ना कोणतीही भावनिक प्रतिक्रिया. तिचा अलिप्तपणा आम्हाला खटकला. मात्र, त्यावेळी अंत्यसंस्कार आणि रुग्णालयातील प्रक्रियेची धावपळ असल्यामुळे आम्ही त्याबाबत काही बोललो नाही.”
ते पुढे म्हणाले, “यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले. तपासात सिया आणि चेतन चौधरी यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर आम्हाला समजले की, आमच्या मुलाची कोणतीही चूक नव्हती. त्याचा फक्त विश्वासघात झाला आणि त्याची किंमत त्याला जीव गमावून चुकवावी लागली.” या प्रकरणातील सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि केतनला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सिया वारंवार केतनसोबत किरकोळ कारणांवरून वाद घालत होती. 4 जून रोजी ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट तिने धरला होता. केतनने सुरुवातीला नकार दिल्यानंतरही सियाने रडारड करत त्याच्यावर दबाव आणल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अखेर तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि वाढदिवसानिमित्त आनंद देण्यासाठी केतन लोहगड किल्ल्यावर जाण्यास तयार झाला. मात्र, त्याचाच तो आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरला.
घटनेनंतर साखरपुड्यानंतर केतनने व्यक्त केलेल्या काही शंका आणि त्याने सांगितलेल्या काही गोष्टी त्याच्या वडिलांच्या पुन्हा आठवू लागल्या. त्यावेळी दुर्लक्ष केलेल्या त्या घटनांकडे आता नव्या दृष्टीने पाहिल्यानंतर आपण एका मोठ्या संकटाचे संकेत ओळखू शकलो नाही, अशी वेदनादायक जाणीव कुटुंबीयांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोर्शे अपघात प्रकरणाशी संबंध? पोलिसांनी स्पष्ट केली वस्तुस्थिती
दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणाचा पुण्यातील चर्चित पोर्शे कार अपघाताशी संबंध जोडणाऱ्या अफवा पसरल्या. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले की, त्या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलगा आणि केतन अग्रवाल हे वेगवेगळे व्यक्ती आहेत. केतन हे विशाल अग्रवाल यांचे पुत्र नसून पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून आणखी पुरावे गोळा केले जात आहेत. तपास पुढे सरकल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

