(अहिल्यानगर )
पुण्यातील गाजलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार यांच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बंटी जहागीरदार हे आपल्या एका साथीदारासह स्कुटीवरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी बंटी त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. गोळीबारात जखमी झाल्यानंतर बंटी जहागीरदारला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.
बुधवारी (31 डिसेंबर) दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. श्रीरामपूर येथील कॉलेज रोड परिसरात कब्रस्तानातून बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी जहागिरदार यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
गोळीबारानंतर त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
या गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दुचाकीवरून आलेले दोघे हल्लेखोर कब्रस्तानाबाहेर जहागिरदार यांच्यावर गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहेत. गोळीबारानंतर परिसरात एकच पळापळ उडाल्याचेही दृश्यांमध्ये दिसून येते. काही नागरिकांनी हल्लेखोरांचे व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केल्याची माहिती आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंध
अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हे नाव 2010 साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणानंतर राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपींपैकी एक होता. दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यानंतर 2023 मध्ये त्याला जामीन मंजूर झाला होता. जामिनावर सुटल्यापासून तो श्रीरामपूर परिसरात वास्तव्यास होता.
बंटी जहागीरदारच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर सावरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. ज्यापैकी काही प्रकरणात त्याला दोषमुक्त करण्यात आलं आहे आणि काहींच्या खटल्यांचे निकष अजून प्रलंबित आहेत. वर्ष 2017 मध्ये त्याविरुद्ध केलेले प्रतिबंध आदेशाचा खटला उच्च न्यायालयात रद्द झाला होता. त्याच्या विरोधात विविध गुन्हे फिर्याद (FIR) आणि कायदेशीर कार्यवाही नोंदली गेली आहे, ज्यात काही न्यायालयांनी त्याला दोषमुक्त केलं होतं आणि काही प्रकरणं अजून न्यायालयीन प्रक्रियेत आहेत.
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 14 , नेवासा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. तर पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादवि कलम 307 , 427 , 120 ( ब ) सह भारताचा स्फोटक कायदा 3,4,5 सह बेकायदा हालचाली प्रतिबंधक अधिनियम 16 व 18 ( जर्मन बेकरी साखळी बॉम्बस्फोटातील सहआरोपी होता. याच प्रकरणात पुन्हा मुंबई दहशतवादी पथकाकडून ( ATS ) मोक्का कायद्याखाली अटक केली होती. 2023 मध्ये जामिनावर बाहेर होता.
हल्ल्यामागे कट की वैयक्तिक वाद?
या गोळीबारामागे वैयक्तिक वाद, टोळी संघर्ष की पूर्वनियोजित कट आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

