(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी येथील उज्वल शिक्षण मंडळ संचलित आगम द कॉलेज ऑफ अप्लाईड आर्टमध्ये पुणे येथील डिजिटल टेक्नॉलॉजी तज्ज्ञ संजय साळुंखे यांच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
कार्यशाळेचे उद्घाटन इंजिनिअर उदय शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुहास भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संजय साळुंखे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर संजय साळुंखे यांच्या हस्ते कॉलेजची अधिकृत वेबसाईट लॉन्च करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अधिक संधी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
संजय साळुंखे हे एम.एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स) पदवीधर असून डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ग्राफिक डिझायनिंग, नेटवर्किंग, प्री-प्रेस टेक्निक्स, वेब डिझायनिंग आणि मल्टिमीडिया अॅनिमेशन या क्षेत्रांतील त्यांना सखोल अनुभव आहे. ते सर्टिफाइड वेब मास्टर असून अमेरिकेतील नोव्हेल कॉर्पोरेशनकडून नेटवर्क टेक्नॉलॉजी, डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन, इन्स्टॉलेशन तसेच सर्व्हिस सपोर्ट या विषयांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले आहे.
या कार्यशाळेत शासकीय आयटीआयमधील डीटीपी विभागाचे विद्यार्थी तसेच इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रा. संदेश पालये यांनी केले. यावेळी प्रतीक्षा पांचाळ, अनिश दाते यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

