(मुंबई)
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, त्यात 23 वर्षीय तरुणाने मदत करण्याच्या हेतूने पुढे गेल्याची मोठी किंमत मोजावी लागल्याचा दावा केला आहे. संबंधित तरुणाच्या म्हणण्यानुसार, एका भांडणात हस्तक्षेप करून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यावरही त्याच्यावर ‘हाफ मर्डर’चा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तब्बल 45 दिवस त्याला सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. या दाव्यामुळे पोलिसांची कार्यपद्धती आणि न्यायव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
इन्स्टाग्रामवरील कंटेंट क्रिएटर दीपक पारेखने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण आपला अनुभव सांगतो. तो सांगतो की, आजारी असल्याने तो घरीच होता आणि मोबाईलवर रिल्स पाहत असताना घराबाहेर गोंधळ ऐकू आला. बाहेर पडल्यावर शेजाऱ्यांमध्ये जोरदार भांडण सुरू होते. इतर लोक फक्त पाहत उभे असताना, त्याने भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि जखमी व्यक्तीला स्वतः रुग्णालयात दाखल केले.
मात्र, दुसऱ्याच दिवशी पोलीस घरी आले आणि त्याला ताब्यात घेतले. आपण फक्त मदत केली होती, असे सांगूनही आपल्यावर ‘हाफ मर्डर’चा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा तो करतो. पोलिसांना आपण निर्दोष असल्याचे माहिती असूनही 45 दिवस सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आल्याचेही तो सांगतो.
व्हिडिओमध्ये तो तुरुंगातील परिस्थितीचे वर्णन करतो. अन्नाची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याचे सांगत, नीट स्वच्छ न करता अर्धवट शिजवलेल्या भाज्या मिळत असल्याचा उल्लेख तो करतो. मात्र, या कठीण परिस्थितीतही त्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. तुरुंगात इतर कैद्यांशी मैत्री केली, वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली, इंग्रजी शिकवली आणि फुटबॉलचे सामने आयोजित केले, असे तो सांगतो. “सूर्यप्रकाश मिळत नव्हता, त्यामुळे मी सेंट्रल जेलमधून गोरा होऊन आलो,” असे त्याचे विधान सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेत आहे.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तो आपल्या प्रेमकथेचा उल्लेख करतो. गेली सात वर्षे सोबत असलेल्या जोडीदाराने या कठीण काळात आपली साथ दिल्याचे तो सांगतो. या तरुणाच्या सकारात्मक भूमिकेचे आणि मदतीच्या भावनेचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. मात्र, निरपराध असूनही त्याला तुरुंगवास भोगावा लागल्याच्या दाव्यामुळे अनेकांनी न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर तीव्र टीकाही केली आहे.
हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 90 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून, सध्या तो सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

