(रत्नागिरी / प्रतिनिधी)
हातखंबा-रत्नागिरी मार्गावर खेडशी नाक्याजवळ सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर डंपर चालकाविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रज्वल प्रमोद पांचाळ (रा. जाकादेवी खालगाव, रत्नागिरी) हे आपल्या पत्नी प्रांजल प्रज्वल पांचाळ (वय २७) यांच्यासह स्कूटर (एमएच ०८ एडब्ल्यू ०५६६) वरून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत होते. सोमवारी सकाळी सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास खेडशी नाक्याजवळील सुयोग मँगो दुकानासमोर त्यांच्या स्कूटरला मागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, प्रांजल पांचाळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती प्रज्वल पांचाळ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पांचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी साहील रामदास निवळकर (वय २२, रा. देवरुख) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, डंपर क्रमांक एमएच ०८ बीके ४०९९ चा चालक राजेश गणपत विश्वकर्मा (वय ३१, रा. एमआयडीसी, रत्नागिरी; मूळ रा. मध्यप्रदेश) याने वाहन निष्काळजीपणे, बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने चालवून हा अपघात घडवून आणला. फिर्यादीच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमागील गंभीर बाब म्हणजे अपघातग्रस्त डंपरमध्ये मोठ्या काळ्या दगडांची ओव्हरलोड वाहतूक सुरू होती. एवढेच नव्हे तर, नियमानुसार माल झाकण्यासाठी आवश्यक असलेली ताडपत्रीही डंपरवर नव्हती. त्यामुळे मोटार वाहन कायदा आणि आरटीओच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हातखंबा-रत्नागिरी मार्गावर दिवस-रात्र अशा प्रकारचे ओव्हरलोड डंपर सर्रास धावत असताना आरटीओ विभागाला हे दिसत नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. रस्त्यावरून उघडपणे नियम मोडणारी वाहने फिरत असताना तपासणी मोहीम कुठे आहे? वजन मोजणी यंत्रणा कुठे आहे? आणि नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न या अपघातानंतर उपस्थित झाले आहेत.
RTO विभागाने तत्काळ कोणती कारवाई केली?
भीषण अपघात घडवून एका विवाहितेचा जीव घेणारा डंपर मोठ्या काळ्या दगडांनी ओव्हरलोड भरलेला असल्याचे घटनास्थळावरील छायाचित्रे आणि प्रत्यक्षदर्शी पाहायला मिळत होते. वाहनावरील माल झाकण्यासाठी आवश्यक असलेली ताडपत्रीही नसल्याचे दिसून येत आहे. असे असतानाही अपघातानंतर RTO विभागाने तत्काळ कोणती कारवाई केली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ओव्हरलोड वाहतूक हा केवळ नियमभंग नसून तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. वाहन पलटी झाल्यानंतर त्याची वजनक्षमता, मालाचे प्रमाण, परवान्याच्या अटी आणि सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी करणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात RTO विभागाकडून कोणती भूमिका घेतली गेली, याबाबत आता नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

