( रत्नागिरी )
रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव परिसरातील गणेश कॉलनी येथे रविवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीत फर्निचर, दुचाकी दुरुस्तीचे साहित्य, संगणक, महत्त्वाची कागदपत्रे तसेच अन्य साहित्य जळाल्याने संबंधित व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा गणेश कॉलनी परिसरातील एका दुकानात शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत शेजारील दुकानांनाही विळखा घातला. त्यामुळे नारायण कृष्णा चव्हाण यांचे फर्निचरचे दुकान, गणेश सुरेश सागवेकर यांचे मोटारसायकल गॅरेज आणि संकेत चंद्रकांत भुते यांचे महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.
आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने दुकानांमधील साहित्य वाचवता आले नाही. फर्निचर, मोटारसायकल दुरुस्तीची उपकरणे, संगणक, महत्त्वाची कागदपत्रे आणि अन्य साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
या दुर्घटनेमुळे तिन्ही व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहावरही मोठा परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील निश्चित करण्याचे काम सुरू आहे.
या घटनेनंतर कुवारबाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, व्यापाऱ्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

