(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जांभरूण क्र. 1 येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले.
योग दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी परिसरातील ऐतिहासिक कातळशिल्पांच्या संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती केली. कातळशिल्पे हा आपल्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा असून त्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमातून प्रभावीपणे दिला.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक संजय कदम, शिक्षक संतोष रावणंग, यास्मिन कोतवाल तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. योगाचे महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

