(सातारा)
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात लग्नाला अवघे 10 दिवस झालेले नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे पाटण तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील राजू झोरे (वय 25) आणि त्यांची पत्नी राणी झोरे (वय 23) हे दुचाकीवरून प्रवास करत होते. येरफळे परिसरात एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे पुढचे चाक निखळून दूर फेकले गेले, तर पिकअप वाहनाच्या समोरील काचेचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
राजू आणि राणी यांचा विवाह अवघ्या दहा दिवसांपूर्वी झाला होता. नववधूच्या हातावरची मेहंदीही उतरली नव्हती, तोच या अपघाताने दोघांचे आयुष्य संपवले. एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची बातमी समजताच सडादाढोली गावात शोककळा पसरली. काही दिवसांपूर्वी ज्या घरातून सनई-चौघड्यांच्या सुरात लग्नसोहळा पार पडला होता, त्याच घरात आता दोघांचे पार्थिव पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
या अपघातामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वेग आणि धोकादायक ओव्हरटेकिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहतूक सुरक्षेबाबत कडक उपाययोजनांची मागणी होत आहे.

