(मुंबई)
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात कामकाज सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी गेम खेळताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ समोर आणल्यानंतर विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या आणि युवानेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली असून कोकाटे यांना थेट इशारा दिला आहे की, “सन्मानाने बाहेर पडा, अन्यथा आणखी व्हिडीओ सार्वजनिक करू.”
माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. “मी कोणाचा विनयभंग केला का? मी चोरी केली आहे का? माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे का?” असे सवाल करीत त्यांनी विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “कोकाटेंची उद्धट आणि उर्मट भाषा गंभीर आहे. विषयाचं गांभीर्य त्यांना समजलेलं नाही. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना आपल्या पदाचा सन्मान राखता येत नाही,” अशी टीका त्यांनी केली.
“रमी खेळण्यासाठी आहे का अधिवेशन?” – अंधारेंचा सवाल
अंधारे पुढे म्हणाल्या, “सभागृहातील प्रत्येक सेकंदाचा खर्च ४७०० रुपये होतो. तो तुमच्या खिशातून नाही, तर जनतेच्या टॅक्समधून येतो. मग हे अधिवेशन लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे की मंत्र्यांनी रमी खेळण्यासाठी?” तसेच, ऑनलाइन गेमिंगमुळे तरुणाई भरकटतेय, आणि मंत्री मात्र सभागृहात अशा गेम्समध्ये गुंतलेत, असा आरोप करत त्यांनी कोकाटे यांच्यावर ताशेरे ओढले.
“आमच्याकडे आणखी व्हिडीओ आहेत”
सुषमा अंधारे यांनी स्पष्ट शब्दांत कोकाटे यांना इशारा दिला, सन्मानाने एक्झिट घ्या. नाहीतर आणखी व्हिडीओ बाहेर काढायला आम्हाला भाग पाडू नका. तुमचा व्हिडीओ विरोधकांनी नाही, तुमच्याच बाकांवर बसलेल्या लोकांनी शूट केला आहे. त्यामुळे आधी त्यांच्या नावाचा शोध घ्या. आधी १२ सेकंदाचा व्हिडीओ, नंतर २४ सेकंदाचा व्हिडीओ समोर आला आहे. आमच्याकडे तुमचे वेगवेगळ्या कृती करतानाचे आणखी व्हिडीओ आहेत, असा दावा त्यांनी केला.
या सर्व प्रकरणामुळे राज्य सरकारची आणि विधीमंडळाची प्रतिमा मलीन होत असल्याचे मत विरोधक व्यक्त करत आहेत. विरोधी पक्ष नेत्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोरात लावून धरली असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.