( अयोध्या )
राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी भाविकांनी अर्पण केलेल्या सर्व मौल्यवान वस्तूंची संपूर्ण नोंद ठेवण्यात आली असून त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला.
ट्रस्टकडे सध्या 32.259 किलो सोन्याच्या वस्तू आणि 1,518.925 किलो चांदी तसेच चांदीसदृश वस्तू असल्याची माहिती देण्यात आली. भाविकांकडून प्राप्त झालेल्या 2,926 मौल्यवान वस्तूंची स्वतंत्र नोंदणी करण्यात आली असून प्रत्येक देणगीसोबत दात्याचे नाव, तारीख आणि संबंधित तपशील जतन करण्यात आल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले.
सोन्याची रामचरितमानस ते चांदीच्या विटा; मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन
देणग्यांच्या सुरक्षिततेबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान ट्रस्टने माध्यमांसमोर काही महत्त्वाच्या वस्तूंचे प्रदर्शनही केले. यामध्ये सोन्याची रामचरितमानस, चांदीच्या विटा, चरणपादुका आणि काकभुशुंडीची प्रतिकृती यांचा समावेश होता. देणग्यांमधील गैरव्यवहाराचे ठोस पुरावे कोणाकडे असतील तर त्यांनी ते विशेष तपास पथकाकडे (SIT) सादर करावेत, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी गंभीर आरोप केला. “राम मंदिरात केवळ पैशांची चोरी झालेली नाही, तर देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचीही चोरी झाली आहे,” असे त्यांनी म्हटले.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करत माजी महासचिव चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा हे आता ट्रस्टचे सदस्य नसल्याचे स्पष्ट केले. सोमवारी झालेल्या बैठकीत त्यांच्या राजीनाम्यांना मंजुरी देण्यात आली.
तसेच निवृत्त भारतीय वन सेवा (IFoS) अधिकारी कृष्ण मोहन यांची अंतरिम महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय विशेष निमंत्रित सदस्यांच्या यादीतून गोपाल नगरकट्टे उर्फ गोपाल राव यांचे नाव हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
देणगी चोरी प्रकरणातील तीन आरोपी पोलिस कोठडीत
राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा आणि करुणेश पांडे या तिघांना स्थानिक न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आधी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या चौकशीत काही नवे पुरावे समोर आले आहेत. या नव्या पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी करणे आवश्यक असल्याने पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी 29 जून रोजी अयोध्येतील न्यायालयाने सर्व आठ आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता नव्या पुराव्यांच्या आधारे तपासाला वेग आला असून या प्रकरणाकडे देशभरातील रामभक्त आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

