(ठाणे)
एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभरात व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारे पंप सुरू करण्यात येणार आहेत. ही महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे परिवहन मंत्री व एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून राबवण्यात येणार आहे.
या संदर्भात माहिती देताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “एस.टी. महामंडळाची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. केवळ प्रवासी तिकीट विक्रीवर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणे ही काळाची गरज आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.”
एस.टी. महामंडळ मागील ७० वर्षांहून अधिक काळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमसारख्या कंपन्यांकडून आपल्या बसेससाठी डिझेल खरेदी करत आहे. सध्या महामंडळाच्या मालकीच्या २५१ ठिकाणी केवळ एस.टी. बसेससाठी इंधन वितरणाचे पंप कार्यरत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंप चालवण्याचा आणि देखभाल करण्याचा भरपूर अनुभव महामंडळाकडे आहे. या अनुभवाचा लाभ घेत आता सर्वसामान्य ग्राहकांसाठीदेखील पेट्रोल-डिझेल विक्री सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात येणार आहेत. राज्यभरातील महामंडळाच्या रस्त्यालगत असलेल्या आणि व्यावसायिकदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण सुरू असून, सुमारे २५ बाय ३० मीटरच्या जागा यासाठी निश्चित केल्या जात आहेत.
‘पेट्रो-मोटेल हब’ची उभारणी
या पंपांवर केवळ इंधन विक्रीच नव्हे, तर रिटेल शॉप्स देखील उभारण्यात येणार आहेत. यामध्ये ‘पेट्रो-मोटेल हब’ उभारण्याची संकल्पना असून, इतर पूरक व्यवसायांनाही यातून संधी मिळणार आहे. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या उपक्रमांमधील असल्यामुळे महसूलवाटपात पूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. व्यावसायिक इंधन विक्रीद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासार्ह सेवा मिळणार असून, एस.टी. महामंडळासाठीही उत्पन्नाचा एक नवा स्थिर स्रोत उपलब्ध होणार आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.