(संगमेश्वर / एजाज पटेल)
जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि जनावरांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत असून सर्वत्र पावसासाठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा येथे मुस्लिम समाजाच्या वतीने पावसासाठी विशेष ‘नमाजे-इस्तिस्का’ अदा करण्यात आली.
इस्लाम धर्मात दुष्काळ किंवा दीर्घकाळ पाऊस न झाल्यास अल्लाहकडे पावसासाठी विशेष प्रार्थना करण्याची परंपरा आहे. त्यानुसार कुरधुंडा येथील मशिदीत आयोजित करण्यात आलेल्या या नमाजमध्ये बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले.
नमाजनंतर उपस्थितांनी अल्लाहकडे हात पसरून जलवृष्टीसाठी सामूहिक दुआ केली. “हे अल्लाह, या सृष्टीवर कृपा कर. शेतांमध्ये हिरवाई फुलू दे, तहानलेल्या धरणीला पाणी मिळू दे आणि सर्व सजीवांना दिलासा दे,” अशी आर्त प्रार्थना करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि नैसर्गिक संकट दूर होण्यासाठीही प्रार्थना केली.
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत श्रद्धा आणि सामूहिक प्रार्थनेतून व्यक्त झालेली ही भावना परिसरात चर्चेचा विषय ठरली असून, लवकरच समाधानकारक पाऊस पडून शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

