(संगमेश्वर / एजाज पटेल)
शनिवारी रात्री दापोली-रत्नागिरी मार्गावरील (गाडी क्र. ५२२९) एसटी बस संगमेश्वर स्थानकात न येता थेट महामार्गाने पुढे गेल्याने महिला, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. मात्र, एका प्रवाशाने रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांच्याशी संपर्क साधताच त्यांनी तातडीने दखल घेत विशेष बसची व्यवस्था केली. वाहतूक नियंत्रक विश्वास फडके यांच्या समन्वयामुळे अवघ्या काही वेळात पर्यायी बस उपलब्ध झाल्याने अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.
संगमेश्वर एसटी स्थानकात शनिवारी रात्री एसटी महामंडळाच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याचा प्रत्यय आला. दापोलीहून रत्नागिरीकडे जाणारी (गाडी क्र. ५२२९) एसटी बस नियोजित वेळेनुसार रात्री ७.४५ वाजता संगमेश्वर स्थानकात येणे अपेक्षित होते. मात्र, बस स्थानकात न वळता थेट महामार्गाने रत्नागिरीच्या दिशेने गेल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
ही बस संगमेश्वरहून रत्नागिरीकडे जाणारी दिवसातील शेवटची सेवा असल्याने अनेक प्रवासी तिची वाट पाहत होते. त्यामध्ये महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. बस न आल्याने अनेकांनी खासगी वाहनांचा आधार घेत पुढील प्रवास सुरू केला. मात्र काही प्रवासी स्थानकातच अडकून पडले.
यावेळी एका प्रवाशाने रत्नागिरी विभागाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती सांगितली. त्यांनी तात्काळ फोन स्वीकारत परिस्थितीची दखल घेतली आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी बस उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
विभाग नियंत्रकांच्या सूचनेनंतर संगमेश्वर स्थानकाचे वाहतूक नियंत्रक विश्वास फडके यांनी तातडीने हालचाली करत विशेष बसची व्यवस्था केली. अवघ्या काही वेळात बस स्थानकात दाखल झाल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांसह उर्वरित प्रवाशांना सुरक्षितपणे पुढील प्रवास करता आला.
या प्रसंगानंतर प्रवाशांनी विभाग नियंत्रक अश्वजित जानराव आणि वाहतूक नियंत्रक विश्वास फडके यांच्या तत्परतेचे कौतुक केले. “प्रवाशांची संख्या कमी असली तरी आमची गैरसोय होऊ दिली नाही. रात्रीच्या वेळी प्रशासनाने दाखवलेली संवेदनशीलता कौतुकास्पद आहे,” अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, नियोजित एसटी बस संगमेश्वर स्थानकात न येता थेट पुढे कशी गेली, याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

