( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या समाजशास्त्र व हिंदी विषयाच्या प्रा. सुवर्णा राजाराम साळवी यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन आनंददायी वातावरणात साजरे करण्यात आले. प्रा. सुवर्णा साळवी यांच्या ३० वर्षाच्या समर्पित सेवापुर्तीच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रा. साळवी यांच्या ३० वर्षाच्या कार्यकाळातील शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्याचा आढावा प्रा. सीमा शेट्ये यांनी घेतला.
प्रा. सुवर्णा साळवी यांना कनिष्ठ महाविद्यालय समिती अध्यक्षा सुजाता प्रभूदेसाई यांनी, तर राजाराम साळवी यांना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी प्रस्तावित केले, यामध्ये त्यांनी प्रा. साळवी यांच्या ३० वर्षातील यशस्वी कार्यप्रणालीचा आढावा घेतला. विद्यार्थिनी वेदिका चव्हाण हिने मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यानंतर सहकारी प्रा. वैभवी घोसाळकर, प्रा. संदीप मुळये, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. विकास शृंगारे, प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. सागर संकपाळ, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, निवृत्त प्रा. एस. एम. तडमोड यांचा शुभेच्छा संदेश प्रा. देवयानी जोशी यांनी वाचला.
प्रा. सुवर्णा साळवी यांनी आपल्या मनोगतात आपल्या ३० वर्षाच्या सेवेतील अनुभव कथन करताना सांगितले की, सेवा काळात संस्था आणि महाविद्यालयाच्या उत्तम पाठिंबामुळे शैक्षणिक व सहशैक्षणिक कामकाजात सहभाग घेऊन यशस्वी होता आले. महाविद्यालयाला लाभलेल्या सर्व प्राचार्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे अध्यापनात यशाची उंची गाठता आली. वरिष्ठ सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना उत्तम अध्यापन कौशल्य विकसित करता आली, तर कनिष्ठ सहकाऱ्यांनी अध्यापनातील आधुनिकतेचा मूलमंत्र दिला. महाविद्यालयातील विविध विभागात काम करून चांगले मानसिक समाधान व सुखावह अनुभव मिळाले. ग्रामीण भागात राहूनही उत्तम शिक्षण देऊन सर्वार्थाने विकास करणाऱ्या आई-वडिलांसह कुटुंबीयांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयाच्या सेवा कालावधीत नवनवीन शिकण्यासाठी व जबाबदारी पेलण्यासाठी समर्थ पाठिंबा दिल्याबद्दल सासरच्या व माहेरच्या कुटुंबीयांचे ऋण व्यक्त केले. संस्था व महाविद्यालय परिवाराबाबत ऋण व्यक्त करून आपल्या मनोगतला विराम दिला.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. साळवी यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव केला. प्रा. साळवी यांनी १२वी समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकाचे केलेले समीक्षण, महाराष्ट्र शासनाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमात विषय तज्ञ म्हणून केलेले कामकाज, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील यशस्वी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. सीमा शेटये यांनी केली. प्रा. साळवी यांना संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सेवापुर्ती निमित्त शुभेच्छा देऊन दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
फोटो : प्रा. सौ साळवी यांना सन्मानित करताना सौ. प्रभूदेसाई, साळवी, प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि पर्यवेक्षक प्रा. लुंगसे.