( संगमेश्वर / प्रतिनिधी )
चैत्र महिन्याच्या प्रारंभी वसंत ऋतूचे आगमन होताच निसर्गात सकाळ पासून कोकीळचे मधुर सूर ऐकू येऊ लागतात. सकाळच्या प्रसन्न वेळी कोकीळचे मधुर सूर म्हणजे निसर्गातील एक उत्तम संगीतच ठरत असते. कोकीळला आम्रसखा देखील म्हटलं गेलं आहे. कोकीळचे कुहू कुहू बोल पूर्वीच्या तुलनेत सध्या काहीसे दुर्मिळ झाल्याचे दिसून येते.
चिपळूण येथील निसर्गप्रेमी सुवर्णा भावे जोशी या सकाळच्या वेळी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी चालायला जातात. त्यांच्या सोबत दररोज छायाचित्रणासाठी कॅमेरा हा असतोच. निसर्गातील विविध फुलं, विविध घटक, निसर्गातील हालचाली, प्राणी आणि पक्षी यांची एकापेक्षा एक सुंदर छायाचित्र त्या घेत असतात. निसर्गातील जो अद्भुत नजारा आपण पाहिला, तो अन्य निसर्गप्रेमींना देखील पाहता यावा यासाठी ही छायाचित्रे त्या सोशल मीडियावर देखील अपलोड करत असतात.
निसर्गातील विविध हालचाली समजण्यासाठी निसर्गाशी एकरूप व्हावं लागतं. गेली अनेक वर्ष सुवर्णा भावे जोशी यांनी निसर्गातील हालचालींचे छायाचित्रण करण्याचा आपला छंद एकनिष्ठपणे जोपासला आहे. म्हणूनच सर्वसामान्य माणसांना जाता येता जे दिसत नाही, ते सुवर्णा भावे जोशी यांच्या नजरेतून सुटत नाही. चिपळूण मध्ये एका ककणेर पक्षाची नजर पपईच्या झाडावरील एका पिकलेल्या पपईवर पडली होती. या पपईचा बराचसा भाग ककणेरने फस्त केला होता. पपईच्या उरलेल्या भागावर मधुर सुरांच्या कोकीळची नजर पडली. सकाळच्या वेळी कोकीळ या पपईचा शांतपणे आस्वाद घेत असल्याचे सुवर्णा भावे जोशी यांच्या नजरेने टिपले आणि नंतर हा क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात छायाबद्ध केला.
वसंत ऋतू, आंब्याचा हंगाम आणि कोकीळ यांचं एक आगळ वेगळं असं नातं आहे. वसंत ऋतुच्या प्रारंभी कोकीळचे मधुर सूर ऐकायला मिळाले नाही असं कधीही होत नाही. गेली काही वर्षे मात्र ज्या संख्येने कोकीळ एकमेकांना सुरांनी साद घालते तसे सलग सूर ऐकायला मिळणे दुरापास्त झाले आहे. याचा दुसरा अर्थ कोकीळची संख्या कमी झाली असावी, असे म्हणण्यास वाव आहे. चिपळूण येथे पपईच्या झाडावरील पिकलेला पपई हळुवारपणे फस्त करणारा कोकीळ त्यानंतर आपले मधुर सूर अधिक मधुर करण्यात यशस्वी झाला असेल यात शंका नाही.
(छाया : सुवर्णा भावे जोशी, चिपळूण)

