(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे येथे aaj (शनिवारी ) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथून देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या गटातील पाच जण समुद्रात बुडाले. त्यापैकी प्रेम दीपक आदमाने (वय १९) याचा मृतदेह सापडला असून उर्वरित चार जणांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बीडकिन येथील १९ जणांचा गट शुक्रवारी रात्री गणपतीपुळे येथे दाखल झाला होता. या गटाने एका खासगी लॉजमध्ये मुक्काम केला. शनिवारी सकाळी स्वयंभू श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर गटातील पाच तरुण समुद्रात अंघोळीसाठी उतरले, तर उर्वरित सदस्य किनाऱ्यावर थांबले होते.
मात्र समुद्रातील लाटांचा आणि पाण्याच्या प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने हे पाचही तरुण खोल पाण्याकडे ओढले गेले. काही क्षणांतच ते समुद्रात बेपत्ता झाले. ही घटना सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी, जीवरक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले. बुडणाऱ्या तरुणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र समुद्रातील तीव्र प्रवाह आणि पाण्याचा वेगवान ‘करंट’ यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
समुद्रात बुडालेल्यांमध्ये आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), प्रेम दीपक आदमाने (१९) आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचा समावेश आहे. सर्वजण बीडकिन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत.
प्रेम आदमाने याचा मृतदेह सापडला असून उर्वरित चौघांचा शोध सुरू आहे. शोध मोहिमेसाठी पोलीस, जीवरक्षक, स्थानिक मच्छीमार तसेच अन्य यंत्रणा कार्यरत आहेत. आवश्यकतेनुसार कस्टम विभाग आणि मच्छीमार बोटींचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून पर्यटकांना समुद्राच्या खोल पाण्यात न जाण्याचे आवाहन केले.
बचाव कार्यात होमगार्ड संदेश धावडे, अंकुश घाणेकर, जीवरक्षक आशिष माने, उमेश म्हादये तसेच स्थानिक व्यावसायिक केतन धनावडे, रोहित चव्हाण, मुबारक सुतार आणि अन्य ग्रामस्थांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दरम्यान, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस, जीवरक्षक आणि स्थानिक प्रशासनाकडून वारंवार इशारे देऊनही काही पर्यटक धोकादायकरीत्या खोल पाण्यात जात असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील आणि त्यांचे सहकारी समुद्रकिनाऱ्यावर विशेष गस्त घालत असून पर्यटकांना सुरक्षिततेच्या सूचना देत आहेत. पावसाळी वातावरण आणि समुद्रातील वाढलेला प्रवाह लक्षात घेता पर्यटकांनी समुद्रस्नान करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

