(देवरूख / वार्ताहर)
मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, देवरूख यांनी चेक बाऊन्स प्रकरणातील एका महत्त्वपूर्ण खटल्याचा निकाल देत आरोपी मुआज्जम महमद साटविलकर यांना दोषी ठरविले आहे. न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी शाखा-देवरूख यांच्या बाजूने निकाल देत आरोपीस एकूण ३९.५० लाख रुपये दंड तसेच साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आदेशित केलेली रक्कम न भरल्यास वाढीव कारावास भोगावा लागणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या देवरूख शाखेकडून आरोपीला वाहन कर्ज मंजूर करण्यात आले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने बँकेला धनादेश (चेक) दिला होता. मात्र संबंधित खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने तो धनादेश अनादरित (बाऊन्स) झाला.
यानंतर बँकेने कायदेशीर प्रक्रिया राबवत परक्राम्य लिखत अधिनियम (Negotiable Instruments Act) कलम १३८ अंतर्गत मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, देवरूख यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. या खटल्यात बँकेच्या वतीने अॅड. वाय. जी. चंदगडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी सादर केलेले दस्तऐवज व पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवित दंड व कारावासाची शिक्षा सुनावली.
निकाल देताना न्यायालयाने व्यवहारातील पारदर्शकता आणि धनादेशाद्वारे दिलेल्या आर्थिक आश्वासनांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. आर्थिक व्यवहारांमध्ये विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले.
या निर्णयामुळे बँकिंग व्यवहारांतील शिस्त आणि आर्थिक जबाबदारीबाबत स्पष्ट संदेश गेला असून, न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच विविध बँकांमध्ये प्रलंबित असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणांसाठीही हा निकाल मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

