(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे सध्या दिवाळी पर्यटन हंगाम चालू असून मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येत आहे. त्यामध्ये अनेक पर्यटक देवदर्शनाबरोबरच पर्यटनाचा आनंद लुटताना समुद्रात आंघोळीसाठी उतरत आहेत. त्यातील काही अति उत्साही पर्यटकांना समुद्रात बुडताना बाहेर काढण्यासाठी स्थानिक व्यवसायिक, जीवरक्षक व गणपतीपुळे पोलीस मोठी मेहनत घेताना दिसून येत आहे.
त्यात शनिवारी येथील समुद्रामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पेण रायगड येथील फॅमिली समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले असता मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आयांश नितीन पवार वय अडीच वर्ष तसेच वडील नितीन शंकर पवार (वय 35 वर्षे) राहणार अमरापूर पेण जिल्हा रायगड येथील असून यामध्ये मुलगा आयांश याला फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण यांनी प्रसंगावधान व तत्परता दाखवून समुद्रात उडी घेऊन वाचवले. तर वडील नितीन शंकर पवार हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले असून गणपतीपुळे जीवरक्षक, व्यावसायिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी शोध घेत आहेत.
आयांश याला वाचवल्यानंतर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या डॉ. प्रणाली भरदारे भिवशी निपाणी बेळगांव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला गणपतीपुळे येथील खासगी रिक्षा ने ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून त्याची तब्येत स्थिर करण्याचे काम केले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. याबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

