(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट परिसरात वन विभागाने मोठी कारवाई करत खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन जप्त केले आहे. या कारवाईत सुमारे १ लाख रुपये किंमतीचे खैर लाकूड आणि अंदाजे ९ लाख रुपये मूल्याचे वाहन हस्तगत करण्यात आले.
वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास तपासणी नाक्यावर पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (एमएच-०८ एपी ६७९४) थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने थांबण्यास नकार देत वाहन वेगाने पळवले. त्यानंतर वन पथकाने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान वाहनात खैर लाकूड आढळून आले. प्राथमिक चौकशीत हे लाकूड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेले जात असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी शुभम मोरे (रा. घोडेगाव, ता. चिपळूण) आणि अजित मोरे (रा. जेजुरी, पुणे) यांच्यावर वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
रोहा येथील उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील आणि इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जप्त केलेले वाहन आणि मुद्देमाल माणगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खैर आणि कात निर्मिती कारखान्यांच्या संभाव्य राज्यस्तरीय नेटवर्कबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.

