(मुंबई)
मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवार (दि. ९ जून) सकाळी साडे नऊच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघातात ४ जणांचा मृत्यू, तर ९ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातात ठाणे जीआरपीचे पोलीस कर्मचारी विकी मुख्यादल यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा स्थानकाजवळ आज (दि.९ जून) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास
अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल रेल्वे आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून दहाहून अधिक प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली ट्रॅकवर पडले. त्यानंतर आता या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले, याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही लोकल ट्रेनमध्ये दरवाजात उभे असलेले प्रवासी एकमेकांच्या खांद्याला खांदा लागत धडकले आणि त्यामुळे १० ते १२ प्रवासी ट्रॅकवर खाली पडले. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात उपचारादरम्यान एकाने प्राण सोडले. अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका जखमी प्रवाशाच्या सांगण्यानुसार, प्रवाशांच्या पाठीला असलेल्या बॅग्ज एकमेकांशी घासल्या गेल्याने संतुलन बिघडले आणि ही दुर्घटना घडली. ट्रॅकमधील अंतर दीड ते दोन मीटर असूनही प्रवासी दरवाजात उभे राहतात, यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा मोठा निर्णय
या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मुंबईसाठी येणाऱ्या २३८ नव्या एसी लोकलमध्ये ‘ऑटोमॅटिक डोअर क्लोजर’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सध्याच्या लोकल गाड्यांमध्येही ICF मार्फत ऑटोमॅटिक दरवाजे बसवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क विभागाने दिली.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे :
मुंब्रा दुर्घटनेतील खालील तिघांचे मृतदेह आणल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली आहे
1. केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)
2. राहुल संतोष गुप्ता
3. विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
4. अज्ञात व्यक्ती
जखमी प्रवासी :
जखमी व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे
1. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)