( मुंबई )
शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातून बाहेर पडलेल्या खासदार-आमदारांवर जोरदार टीका केली. “माझ्यावरचे आरोप शिवसैनिकांना खरे वाटत असतील तर मी एका क्षणात पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. मात्र शिवसेना गद्दारांच्या हाती देणार नाही,” असे भावनिक वक्तव्य करत त्यांनी शिवसैनिकांना एकजुटीचे आवाहन केले.
षण्मुखानंद सभागृहात झालेल्या शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक संकटे, राजकीय वादळे आणि पक्षफुटीच्या घटनांनंतरही ते खंबीरपणे उभे आहेत. “कोणी फुटल्याने मी डगमगलो नाही. शिवसैनिकांचा विश्वास असेल तर मी पहाडासारखा उभा राहीन. पण ज्याक्षणी तुम्हाला वाटेल, त्या क्षणी मी पद सोडायला तयार आहे,” असे ते म्हणाले.
भाजपवर निशाणा साधताना ठाकरे यांनी आरोप केला की, देशात विरोधी पक्ष संपवण्याचे आणि एकच पक्ष ठेवण्याचे राजकारण सुरू आहे. “आमदार-खासदारांचा आता हमीभाव ठरला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसा नाही, पण लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी खोके आहेत,” असा टोला त्यांनी लगावला. भाजप करत असलेली पक्षांची ’चोरी’ लपवण्यासाठी त्याला ’ऑपरेशन’ असे गोंडस नाव दिले जात असल्याचे ते म्हणाले.
“तरुण पेटले तर सरकार राहणार नाही”
देशातील तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही त्यांनी भाजपला इशारा दिला. “आजच्या तरुणांना झुरळ समजले जाते. पण हीच तरुणाई पेटली तर कोणतेही सरकार टिकणार नाही,” असे ठाकरे म्हणाले. पक्षातील 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडल्यावरून ठाकरे यांनी मतदारांची माफी मागितली. त्याचवेळी तुम्ही ज्यांना मते दिलीत, त्यांनी तुमचा विश्वासघात केला. त्यांना जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही बजावणार की नाही? सवाल करत ठाकरे यांनी शिवसैनिकांना फुटीर खासदारांच्या विरोधात पेटून उठण्याचे आदेश दिले.
“ऑपरेशन कमळला उत्तर द्यावे लागेल”
राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी “ऑपरेशन कमळ”चा उल्लेख केला. “लोकशाहीवरील विश्वास कमी होत चालला आहे. हेच सुरू राहिले तर सर्वांनी मिळून ‘ऑपरेशन कमळ’ राबविण्याची वेळ येईल,” असे त्यांनी सांगितले. “काँग्रेसनेही आमची माणसे फोडली होती, पण त्यांनी कधी मातोश्रीवर डोळा ठेवला नाही. त्यांनी असे छळले नाही. भाजपा आज शिवसेना उखडून टाकायला निघाला आहे. हा फरक आहे तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये. 30 वर्षे भाजपसोबत राहूनही आम्ही त्यांच्यात विलीन झालो नाही, मग काँग्रेसमध्ये कसे विलीन होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जे खासदार गेले त्यांच्या मतदारांची मी जाहीर माफी मागतो. मोदी लाटेच्या विरोधात लोकांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला होता. त्या विश्वासाचा आदर केला गेला पाहिजे.” भाषणाच्या शेवटी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत म्हटले, “शिवसेना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी निर्माण झाली आहे. ही शिवसेना कोणाच्या दारात विलीन होण्यासाठी जन्माला आलेली नाही. शिवसेना हवी की नाही, याचा विचार आता शिवसैनिकांनी आणि जनतेने करायचा आहे.”
‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’च्या घोषणांनी सभागृह दणाणले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांदरम्यान पक्षासोबत ठामपणे उभे राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सभागृहात आगमन होताच शिवसैनिकांनी उत्स्फूर्त जल्लोष केला. ‘कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला’, ‘निष्ठावंत राजाभाऊ वाजे’ अशा घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले. शिवसैनिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात राजाभाऊ वाजे यांचे स्वागत करत त्यांना मानवंदना दिली. पक्षनिष्ठा कायम राखल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी विशेष आदर व्यक्त केला.
यावेळी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारावेळीही राजाभाऊ वाजे यांना शिवसैनिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी होत राहिल्याने सभागृहातील वातावरण अधिकच उत्साही झाले.

