(नवी दिल्ली)
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दूरसंचार विभाग (DoT) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (TRAI) तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. विशेषतः नव्याने विकसित आणि दुर्गम भागांतील राष्ट्रीय महामार्गांवर मोबाईल संपर्क नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम होत असल्याचा इशारा प्राधिकरणाने दिला आहे.
सार्वजनिक सुरक्षिततेवर परिणाम
राष्ट्रीय महामार्ग जाळ्याचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, देशभरातील महामार्ग कॉरिडॉरवर मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी समन्वित आणि जलद उपाययोजना करण्याची गरज असल्याचं NHAI ने स्पष्ट केलं आहे. अपघात, आपत्कालीन परिस्थिती आणि मदतसेवांशी संपर्क साधताना मोबाईल नेटवर्क अत्यंत महत्त्वाचं असल्याचंही प्राधिकरणाने अधोरेखित केलं आहे.
1,750 किमी अंतरात 424 ठिकाणी नेटवर्क नाही
NHAI ने केलेल्या सर्वेक्षणात राष्ट्रीय महामार्ग जाळ्यातील सुमारे 1,750 किलोमीटर अंतरामधील 424 ठिकाणे मोबाईल नेटवर्क अभावामुळे गंभीरपणे प्रभावित असल्याचं आढळून आलं आहे. या ठिकाणांची सविस्तर माहिती संकलित करून आवश्यक कारवाईसाठी DoT आणि TRAI कडे अधिकृतपणे पाठवण्यात आली आहे.
अपघातप्रवण ठिकाणी SMS अलर्टची मागणी
याशिवाय, भू-नकाशित अपघातप्रवण ठिकाणी, मोकाट जनावरांची हालचाल असलेले रस्ते आणि इतर धोकादायक भागांबाबत सक्रिय SMS किंवा फ्लॅश SMS अलर्ट प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना निर्देश देण्याची विनंती NHAI ने TRAI कडे केली आहे. हे इशारे वाहनचालक त्या ठिकाणी पोहोचण्याआधीच मिळाल्यास अपघात टाळण्यास मदत होईल, असा प्राधिकरणाचा विश्वास आहे.
डिजिटलदृष्ट्या सक्षम महामार्गांचे उद्दिष्ट
मोबाईल नेटवर्कमधील त्रुटी दूर करून राष्ट्रीय महामार्गांवरील सुरक्षितता वाढवण्याचा NHAI चा प्रयत्न आहे. महामार्ग केवळ भौतिकदृष्ट्या जोडलेले नसून डिजिटलदृष्ट्या सक्षम असावेत, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून काम करण्याची वचनबद्धता प्राधिकरणाने व्यक्त केली आहे.
हे प्रयत्न देशभरातील नागरिकांसाठी अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि वापरकर्ताकेंद्रित राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या व्यापक उद्दिष्टाशी सुसंगत असल्याचं NHAI ने स्पष्ट केलं आहे.

