( सातारा / पुणे )
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या विधानाचा तीव्र निषेध करत आंदोलन केले. बारामतीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पोस्टरला ‘जोडे मारो’ आंदोलनही करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी या संपूर्ण वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘महिलांबाबत बोलताना राजकारणाची पातळी सोडू नये’
सातारा येथे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एखादी महिला राजकारणात सक्रियपणे काम करत असेल तर तिला प्रोत्साहन दिले पाहिजे. काँग्रेसने नेहमीच राजकारणाची पातळी सांभाळली आहे. सुनेत्रा पवार या सध्या सक्रिय राजकारणात असून एका घटनात्मक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना राजकारणाची पातळी सोडून बोलणे योग्य नाही. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचा दाखला देत सुनेत्रा पवार यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले. “राम मनोहर लोहियांनी इंदिराजींबद्दल जो शब्दप्रयोग केला होता, त्याला इंदिराजींनी कृतीतून उत्तर दिले होते. सुनेत्रा पवारदेखील कृतीतून उत्तर देतील,” अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
‘गुंगी गुडिया’ पोस्टवरून वाद नेमका कसा सुरू झाला?
बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद आटोपल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून त्यांच्यावर टीका करताना ‘गुंगी गुडिया’ असा शब्दप्रयोग करण्यात आला.
या पोस्टवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसने महिलांचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसने या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या टिप्पणीचा निषेध केला आहे.
दरम्यान, महिलांबाबत अशा प्रकारचे शब्द टाळता आले असते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्पष्ट केले. पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, तसेच मंत्र्यांना उत्तर न देण्याचाही अधिकार आहे. मात्र, बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अनुत्तरित राहतो. या परिस्थितीवर गृहमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे, अशी उपरोधिक भूमिका त्यांनी मांडली.
‘माझा त्या पोस्टशी काहीही संबंध नाही’
सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित सोशल मीडिया पोस्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. “सुनेत्रा पवारांशी संबंधित पोस्टशी माझा कोणताही संबंध नसताना माझ्या विरोधात आरोप आणि आंदोलन करण्यात येत आहे. कोणावरही आरोप करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे,” असा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.
अमृता फडणवीसही सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ
दरम्यान, या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि समाजसेविका अमृता फडणवीस यांनीही सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे.
‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस यांनी सुनेत्रा पवार या सक्षम महिला असल्याचे म्हटले. अजित पवार यांच्या राजकीय प्रवासात सुनेत्रा पवार यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांनी घर आणि शेती सांभाळल्यामुळे अजित पवारांना बाहेर जाऊन काम करण्याची आणि राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली, असे अमृता फडणवीस यांनी नमूद केले. “एखाद्या महिलेचा अशा प्रकारे अपमान करणे योग्य नाही. पुरोगामी महाराष्ट्रात हे खपवून घेतले जाऊ नये. काँग्रेसने याबद्दल माफी मागितली पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होणार? अमृता फडणवीस म्हणाल्या…
दरम्यान, देवेंद्र फडणवीस भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील, अशी चर्चा आणि त्यांच्या काकांनी केलेल्या वक्तव्याबाबतही अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्तमानात जगण्यावर भर दिला. देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्राची सेवा करत असून महाराष्ट्राचे सेवक म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडत आहेत, असे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्र हेच देवेंद्रजींचे कार्यक्षेत्र आहे आणि त्यांनी येथे चांगले काम करावे,” अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.
सुनेत्रा पवार यांच्यावरील ‘गुंगी गुडिया’ टिप्पणीमुळे सुरू झालेला हा वाद आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांमुळे आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

