(मुंबई)
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी मोठे राजकीय संकेत दिले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेदरम्यान शिंदे यांनी, “हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे म्हणत आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
मुंबईत आयोजित शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिंदे यांनी थेट ‘ऑपरेशन टायगर’चा उल्लेख टाळला. मात्र आपल्या भाषणातून त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत आगामी काळात आणखी मोठे राजकीय बदल घडू शकतात, असे संकेत दिले.
महाराष्ट्राचा खरा ‘टायगर’ कोण?
आपल्या भाषणात शिंदे म्हणाले, “आज महाराष्ट्राचा टायगर तुमच्यासमोर उभा आहे. काही लोक भुंकत राहतात, पण वाघ एकटाच चालतो आणि शिकार करतो. ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. आम्ही सर्वसामान्य मराठी माणसासाठी लढतो. देशद्रोह्यांवर प्रहार आणि सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना.” त्यांनी पुढे हिंदीतही जोरदार भाष्य करत, “कुछ कुत्ते भौंकते रहते हैं, लेकिन शेर दहाड़ता है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है,” असे म्हटले. या विधानानंतर सभास्थळी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
‘ऑपरेशन टायगर’मुळे उद्धव ठाकरे गटात खळबळ
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे लोकसभा सदस्य संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील-आष्टीकर आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी बोलावण्यात आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाच्या बैठकीला हे खासदार अनुपस्थित राहिल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षणाचा सल्ला
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “लोक तुम्हाला का सोडून जात आहेत, याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले तरी तो वाघ होत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना गेल्या चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठ्या राजकीय संकटातून जात असल्याचा उल्लेख करत त्यांनी पक्षातील नाराजीचे खापर विरोधी नेतृत्वावर फोडले.
खासदारांना शिव्या आणि सकाळी कौतुक; शिंदेंचा घणाघात
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले, “रात्री खासदारांना शिव्या द्यायच्या आणि सकाळी त्यांचे कौतुक करायचे, हे चालणार नाही. सेनापती घरात बसून चालत नाही, त्याने रणांगणात उतरले पाहिजे. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे. संकटाच्या वेळी मी कार्यकर्त्यांसोबत उभा राहतो.” “तुडवा म्हणणाऱ्यांनी हिंमत असेल तर समोर यावे. तुडवायला पाय लागतात. तुम्ही समोर आलात तर शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?” असा इशाराही त्यांनी दिला.
‘मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो’
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला अप्रत्यक्षपणे जोडत शिंदे म्हणाले, “मी डॉक्टर नाही, पण ऑपरेशन करतो. ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही.” या विधानामुळे आगामी राजकीय घडामोडींविषयीच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक; बाळासाहेबांची स्वप्ने पूर्ण झाल्याचा दावा
भाषणादरम्यान शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष कौतुक केले. “१२ वर्षांच्या कारकिर्दीत मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही. अयोध्येतील राम मंदिर उभारणी आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्ने होती. ती मोदींनी पूर्ण केली,” असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांनाही शिंदे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “काही लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. पण आम्ही सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही. आम्ही विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्य शिवसैनिकांनाच संधी; घराणेशाहीवर टीका
पक्षातील संधी आणि पदवाटपाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “आमदार किंवा मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून संधी मिळणार नाही. कर्तृत्व असेल तरच संधी मिळेल. माझ्याकडे वशिला लागत नाही, पैसे लागत नाहीत, मर्सिडीज लागत नाही. शिवसैनिक हाच पक्षाचा खरा आधार आहे.” त्यांनी राज्यसभेवर सर्वसामान्य कार्यकर्ती ज्योती वाघमारे यांची नियुक्ती केल्याचे उदाहरण देत, “आम्ही सामान्य शिवसैनिकाला पुढे आणतो,” असे सांगितले.
इथून पुढे औकातीत राहून बोलायच…
शिवसेनेचा ढाण्या वाघ कोण महाराष्ट्राने मान्य केलंय, हे खरं ऑपरेशन टायगर आहे. राऊत बेताल वक्तव्य करतात.आम्ही ऑपरेशन तुडवा करणार असे म्हणाले. पण तुमच्या विधानाने यूबीटी बुडवा आणि काँग्रेस वाढवा चाललय, अशी टीका खासदार ज्योती वाघमारेनी केली आहे. राडा करणाऱ्यासाठी मनगटात दम असावा लागतो. त्यासाठी वाघाचं काळीज असावं लागतं, जे एकनाथ शिंदेंकडे आहे. नैतिकता, लाज शिल्लक असेल तर राजीनामा टाका. तुम्ही वाघाचं कातड पांघरलेले लबाड लांडगे आहात. इथून पुढे औकातीत राहून बोलायच. नाहीतर तोंड फोडायचं कसं हे शिवसैनिकांना माहितीय. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी त्यांची अवस्था आहे. पक्षाची शकलं झाली मग कसला घमेंड करताय? असा प्रश्न वाघमारेंनी उपस्थित केला.
२०२२ च्या बंडानंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय हालचाली
जून २०२२ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह शिंदे गटाला दिले. आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मधील सहा खासदारांच्या संभाव्य प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा शिगेला पोहोचली असताना, “हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” या एकनाथ शिंदे यांच्या विधानामुळे आगामी दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

