(संगमेश्वर / प्रतिनिधी)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त संगमेश्वर तालुक्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाच्या वतीने देवरुख येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांना जिलेबी वाटप करून वर्धापन दिनाचा आनंद साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे चौकात काही काळ उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवसैनिकांनी नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांचे स्वागत करत त्यांना जिलेबी वाटप केले. पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, माजी पंचायत समिती उपसभापती अजित उर्फ छोट्या गवाणकर, बाळा कामेरकर, तेजस भाटकर, दादा शिंदे, अक्षय कुमटेकर यांच्यासह संजय माईन, सचिन शिंदे, अमर गवाणकर, पप्या गुरव, दया चव्हाण, गौरव जंगम, महेश शिंदे आणि अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा वर्धापन दिन हा प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस असल्याचे सांगत जनतेशी असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. नागरिकांशी थेट संवाद साधत वर्धापन दिनाचा आनंद सामायिक करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, शिवाजी चौकात पार पडलेल्या या ‘गोड’ उपक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असून, शिवसैनिकांचा उत्साह आणि मोठ्या प्रमाणातील सहभाग हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

