(रत्नागिरी)
जी. एच. रायसोनी स्मृती रत्नागिरी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६, रा.भा. शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात १७ व १८ मे रोजी रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आली. रायसोनी फौंडेशनने या स्पर्धेला विशेष आर्थिक सहकार्य दिले. खुल्या आणि महिला गटातून प्रत्येकी चार खेळाडूंची राज्य निवड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
खुल्या गटात वरद पेठेची आघाडी
दि. १८ मे रोजी झालेल्या अंतिम फेरीत वरद पेठेने (६ पैकी ६ गुण) अपराजित राहून खुल्या गटात विजेतेपद पटकावले. त्याच्या अचूक आणि सुसंगत खेळाचे कौतुक करण्यात आले. यश गोगटेने उपविजेतेपद मिळवले, तर अनिकेत रेडिज आणि निधी मुळे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहिले. विशेष म्हणजे निधी मुळेने महिलांऐवजी खुल्या गटात खेळून जिल्हा संघात स्थान मिळवले.
महिला गटात सई प्रभुदेसाई विजेती
महिला गटात सई भूषण प्रभुदेसाईने ५.५ पैकी ६ गुण मिळवत आपली निर्विवाद बाजी मारली. तनया आंब्रे दुसऱ्या क्रमांकावर, मृणाल कुंभार तिसऱ्या तर अदिती पाटील चौथ्या क्रमांकावर राहिल्या. उत्तेजनार्थ पारितोषिके सानवी दामले व आर्या पळसुलेदेसाई यांना देण्यात आली.
बक्षीस वितरण आणि मान्यवरांचे मार्गदर्शन
बक्षीस समारंभाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव, अभाविपचे प्रदेश अध्यक्ष, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट आणि व्होकेशनल बोर्ड अशा विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्रीकांत दुदगीकर उपस्थित होते. तसेच, फिडे रेटेड खेळाडू आणि LIC मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनंत गोखले यांचीही उपस्थिती लाभली. श्री. दुदगीकर यांनी आपल्या भाषणात “बुद्धिबळ हा खेळ व्यक्तिमत्वविकासासाठी उपयुक्त आहे,” असे सांगत एकाग्रता, संयम, मेहनत व चिकाटी यांची महत्ता अधोरेखित केली.
अन्य पुरस्कार
उत्तेजनार्थ: अपूर्व बंडसोडे, आयुष रायकर, विहंग सावंत
सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू: सुहास कामतेकर
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व रा.भा. शिर्के प्रशालेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. पंच म्हणून विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांनी जबाबदारी पार पाडली.