(रत्नागिरी)
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण २० जून २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित किसान सन्मान संमेलनातून पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी थेट जमा केला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. थेट प्रक्षेपण नागरी सेवा केंद्रांसह विविध कृषी संस्थांमध्येही उपलब्ध असणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला ३१.४४ कोटी रुपयांचा लाभ
पीएम किसान योजनेच्या २३ व्या हप्त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५५ हजार ६७० शेतकरी पात्र ठरले आहेत. या हप्त्याअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ३१ कोटी ४४ लाख रुपयांहून अधिक निधी थेट जमा होणार आहे.
योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या २२ हप्त्यांमधून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण ६६ हजार ७७७.८३ लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत मिळाली आहे.
आधार लिंकिंग आणि ई-केवायसी अनिवार्य
केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. मात्र हा लाभ अखंडितपणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडणे (Aadhaar Linking) तसेच ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर कार्यक्रमांचे आयोजन
किसान सन्मान संमेलनाचे थेट प्रक्षेपण जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे (KVK) तसेच नागरी सेवा केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, कृषी अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच निमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देणे, लाभार्थ्यांचा गौरव करणे तसेच शेतकऱ्यांसाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

