(रत्नागिरी)
लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या कामासाठी शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आ. किरण (भैया) सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय झाला असून, प्रलंबित प्रश्नाला अखेर मार्ग मिळाला आहे.
बेर्डेवाडी प्रकल्पाचे धरण व कालव्याचे बहुतांश काम २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १० किलोमीटर लांबीचे उजवे व डावे कालवे असून, एकूण १०८१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे. डाव्या कालव्याचे सुमारे ६ किलोमीटर काम २०१६ मध्ये पूर्ण झाले होते; मात्र अस्तरीकरण नसल्याने पाणी केवळ २ किलोमीटरपर्यंतच पोहोचत होते.
आ. सामंत यांच्या प्रयत्नांमुळे २०२५ मध्ये कालव्याची डागडुजी करण्यात आली आणि पाणी ५ किलोमीटरपर्यंत पोहोचवण्यात यश आले. तरीही कालवा अस्तरीकरण नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत होते, त्यामुळे शेतीचे नुकसान आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
या पार्श्वभूमीवर वेरवली बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मागील चार वर्षांपासून कालवा बंदिस्त नलिका प्रणालीत रूपांतरित करण्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन आ. सामंत यांनी कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या पाठपुराव्याला यश मिळत डावा कालवा (कि.मी. ० ते ६) बंदिस्त नलिका प्रणालीत पुनर्स्थापित करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे सुमारे ५२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
तसेच, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीबाबत केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र (CWPRS), पुणे यांचा अहवाल प्राप्त झाला असून, आवश्यक दुरुस्तीनंतर उजव्या कालव्याद्वारेही बंदिस्त नलिका प्रणालीने पाणी सोडण्याची योजना आहे.
या निर्णयामुळे बेर्डेवाडी प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार असून, वेरवली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

