(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील शिरगाव येथे शिगवण महाराज मठामागील शेतात बेवारस अवस्थेत आढळलेल्या सडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर पटली असून, तो अलोरे येथील महेश राजाराम यादव यांचा असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली अनिश्चितता काही प्रमाणात दूर झाली असली, तरी त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
बुधवारी सकाळच्या सुमारास शिगवण महाराज मठाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह बराच काळ उघड्यावर पडून राहिल्याने तो सडलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते. या घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने परिसराची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
तपासादरम्यान तसेच नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीची ओळख अलोरे येथील महेश राजाराम यादव अशी पटली. यादव हे गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मद्यपानाचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, नशेच्या अवस्थेत ते अनेकदा विविध ठिकाणी आढळून येत असत. काहीवेळा ते सलग काही दिवस घरी न परतल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत असे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, महेश यादव यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, त्यांच्या मृत्यूमागे कोणतेही संशयास्पद कारण आहे का, तसेच ते शिरगाव परिसरात कशा परिस्थितीत पोहोचले, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
प्राथमिक तपासात कोणतीही संशयास्पद बाब समोर आलेली नसली, तरी शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासातून मृत्यूमागील कारणांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

