(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील स्ट्रीट लाईट वाढलेल्या झाडे आणि झुडपांच्या विळख्यात अडकल्याने परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. आरोग्य केंद्रासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, संबंधित यंत्रणेने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गालगत असलेले साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील अनेक गावांसाठी आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र मानले जाते. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येथे येत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी आपत्कालीन उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुरक्षित व प्रकाशमान परिसराची आवश्यकता असते. मात्र, सध्या येथे नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य केंद्राच्या आवारात बसविण्यात आलेला स्ट्रीट लाईट कार्यरत असला तरी त्याभोवती वाढलेल्या झाडांच्या फांद्या आणि दाट झुडपांमुळे प्रकाशाचा झोत जमिनीपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, संपूर्ण परिसरात अंधुक वातावरण निर्माण होत असून सुरक्षेच्या दृष्टीनेही हा गंभीर प्रश्न बनला आहे. या समस्येकडे लक्ष वेधताना स्थानिक नागरिक रमेश शिंदे यांनी वाढलेली झाडे व झुडपे तातडीने छाटून परिसर प्रकाशमान करण्याची मागणी केली आहे. आरोग्य केंद्रासारख्या सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवेशी निगडित ठिकाणी अशी परिस्थिती असणे दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रुग्णांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीसुविधांचा प्रश्न लक्षात घेता संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वाढत्या अंधारामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून परिसरातील झाडे-झुडपे हटवून स्ट्रीट लाईटचा प्रकाश प्रभावीपणे उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

